Friday, June 26, 2009

भाग -- 13 -- थोडेसे बाजार व्यवस्थापन

भाग -- 13 tallied with book on 24-07-2011
संगणक म्हणजे थोडेसे बाजार व्यवस्थापन


संगणक म्हणजे निर्देश दिलेल्या पद्धती बरहुकूम उपलब्ध माहितीची छाननी करून निष्कर्ष काढू शकणारे यंत्र. जगभर मान्य असलेली ही व्याख्या पाहिली तर फार पुरातन काळातले साधी बेरीज करू शकणारे यंत्र देखील संगणक ठरते. पण आकड्यांची द्विअंश पद्धत वापरून इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या आधाराने संगणकाचा विकास 1945 च्या आसपास सुरू झाला. त्या संगणकाना आजच्या तुलनेत शंभरपट वीज (पॉवर) आणि हजारपट जागा लागत असे. त्यावर वैज्ञानिकांनी काम करायला सुरुवात केली तेव्हा प्रत्येक संगणक म्हणजे ज्याला जसा हवा तसा बनवला गेला. त्यात कारभारी डब्यासारखी बाहेरील खोळ सुद्धा असायची गरज नव्हती. वेगवेगळ्या PCB वर ट्रायोड व इतर सर्किट्स मांडून त्यांना कसेही जोडून चालायच- मुख्य मुद्दा होता त्याच्याकडून काम करवून घेण्याचा. मात्र सेमीकण्डक्टर आणि इंटिग्रेटेड सर्किट या इलेक्ट्रॉनिक्समधील दोन शोधांनंतर वीज आणि जागा दोन्हींची गरज खूप कमी झाली.

मग 1980 च्या सुमारास कधीतरी IBM कंपनीच्या लक्षांत आले की आपण संगणक बनवायची फॅक्टरी टाकून त्यांची मोठया प्रमाणावर विक्री करु शकतो. यासाठी संगणकाच्या जडवस्तूंना प्रमाणबध्द केले (हार्डवेअर स्टॅण्डर्डायझेशन) की झाले. म्हणून त्यांनी असे प्रमाण ठरवायला सुरुवात केली. एक अमुक आकाराचा मदरबोर्ड असेल, त्यावर अमक्या आकाराची हार्डडिस्क असेल व ती या पध्दतीच्या पिनांनी जोडली जाईल - जोडणा-या केबल्स अशा पध्दतीच्या असतील, प्लग, सॉकेट्स अमक्या पध्दतीचे असतील - वगैरे. तसं पाहिलं तर अशा जडवस्तू फार नसतात. त्यामुळे त्याचे प्रमाण ठरवणे आणि त्यांचे मोठे उत्पादन करणे शक्य झाले.
कशा-कशाला प्रमाणभूत केले?

1) कारभारी डब्याच्या आतला मदर बोर्ड.
2) कारभारी डबा आणि मॉनिटरला पॉवर सप्लाय करणाऱ्या केबल्स
3) मॉनिटर व कारभारी डब्याला एकमेकांशी जोडणा-या तारा आणि प्लग-सॉकेट्स
4) माऊस व की बोर्ड जोडणा-या तारा आणि त्यांचे प्लग-सॉकेटस
5) मदर बोर्डावर बसविण्याच्या हार्ड-डिस्क, रॅम, प्रोसेसर चिप, यांचे आकार व जोडण्याचे स्क्रू अथवा पिना.
6) कारभारी डब्याच्या आतील सर्व केबल्समधे एकावेळी सोळा सिग्नल्स घेऊन जाणा-या तारा असतात. त्यांना बस (bus) म्हणतात. त्यांना प्रमाणीभूत केले.
7) मायक्रोफोन व लाऊडस्पीकर जोडणारे प्लग, सॉकेटस
8) सीडी व फ्लॉपी ड्राइव्ह म्हणजे कारभारी डब्यामधे फ्लॉपी किंवा CD टाकण्यासाठी नेमकी जागा आणि आतमध्ये त्यावरील मजकूर वाचण्यासाठी केलेली यंत्रणा.
9) अगदी अलीकडे पेनड्राईव्ह, इंटरनेटसाठी वाय-फाय कार्ड इत्यादी वेगवेगळी उपकरणं निघाली आहेत ती जोडणारे प्लग-सॉकेट्स
वगैरे.

हे प्रमाणक त्यांनी प्रसिद्ध करून टाकले. त्यांचा कॉपीराइट ठेवला नाही. यामुळे काय झाल की इतर कंपन्यांनी देखील हेच प्रमाणक वापरून उपकरणं बनवली व त्यांना IBM compatible असे नांव पडले. मग या कंपन्या ग्राहकांना सांगू शकल्या की तुम्ही आमचा संगणक घ्या, त्याचे स्पेअर पार्टस्‌ कुठेही मिळतील- मुख्य म्हणजे ते प्रमाणभूत असतील त्यामुळे एकाचे दुस-याला चालू शकतील किंवा नादुरुस्त झाल्यास बदलता येतील.

अशा प्रकारे प्रमाणबध्द करणे, फॅक्टरी उत्पादन करून खप वाढविणे, यामुळे झाले काय की संगणकाचा वापर खूप मोठया प्रमाणावर होऊ लागला आणि हळूहळू त्याच्या किंमतीही कमी कमी करता आल्या.

एकीकडे हे होत असतांना दुसरीकडे सॉफ्टवेअरचे तंत्रही विकसित होत होते. संगणकासाठी इंटिग्रेटेड सर्किट ऐवजी मायक्रोप्रोसेसर चिप आल्या ते पुढचे पाऊल होते कारण आकडेमोड करण्याचा चिपचा वेग तसेच साठवण क्षमता आय्.सी. च्या तुलनेत कित्येक हजारपट जास्त होती. एकेका मायक्रोप्रोसेसरचे डिझाइन करायला लाखो डॉलर्सचा खर्च येतो. पण त्यांच्याकडून कामंही तशीच अफाट केली जातात.

संगणक विकासात अगदी सुरवातीला संगणकाला निर्देश देण्यासाठी संगणकाच्या विशिष्ट भाषेत पायरी-पायरीने एक-एक निर्देश लिहून ते संगणकाला सांगावे लागत. एखादा निर्देश चुकला तर संगणक ठप्प होणार, मग आपण एकेका निर्देशाची तपासणी करत कुठे चुकलो ते शोधून काढायचे अशी प्रक्रिया होती. संगणकाच्या विशिष्ट भाषा जसे की बेसिक, कोबोल, फोरट्रॉन इत्यादी शिकून घ्याव्या लागत. तरच प्रोग्रामिंग तज्ज्ञ होता येई. तसे होऊनही एकेका कामाचा प्रोग्रॅम लिहायला कित्येक दिवस लागत असत

संगणकाकरवी काम होण्यामधे  कळपाटीच्या माध्यमातून मानवी भाषेला विवेचकापर्य़ंत (प्रोसेसर) पोहोचवणे, तिथे त्या संदेशाची मशीनी भाषेत दखल घेतली जाणे, हार्डडिस्क मधे साठवण होणे, निर्देशाबरहुकूम प्रक्रिया होणे, व मानवी भाषेत रूपान्तर होऊन पुन्हा आपल्याला समजणे एवढे पाच टप्पे आहेत.

या सर्वाचा मूळबिंदु म्हणजे मानवी भाषेला मशीन लँग्वेज मधे बदलून विवेचकाकडे ठराविक जागी पोचवणे. सॉफ्टवेअरच्या विकासांत मशीन लँग्वेज ते  असेम्ब्लर, कम्पायलर, प्रोग्रामिंग लँग्वेज, खुद्द प्रोग्राम, व तो वापरून केलेले काम हार्ड डिस्कमधे साठणे असे टप्पे विकसित झाले. . यातील प्रत्यक्ष वापरणाऱ्याने केलेल्या कामाखेरीज इतर सर्व टप्पे एकत्रपणे Standardise करून ऑपरेटिंग सिस्टम (OS) बनवतात. १९९० पासून पुढे हळूहळू अधिकाधिक प्रगत OS बनत गेल्या. यातील विण्डोज व लीनक्स ही नावे आपण ऐकतो. 

हे एका उदाहरणावरून समजून घेऊ या. एक खोली, त्यांत ठेवलेली लोहाराची हत्यारं, त्यापासून बनवलेलं किंवा बाहेरून आणलेलं लेथ मशीन, त्याने बनवलेला चाकू, व एक पपई अशी कल्पना करा.खोलीमुळे हे सर्व सामान ठेवण्याची सोय झाली. संगणकाची ऑपरेटिंग सिस्टम अशी सोय देते.(मात्र, हत्यारं होती म्हणूनच खोली बांधता आली हे ही विसरून चालत नाही.) हत्यारं वापरून लेथ मशीन, व ते वापरून चाकू बनवणे आणि तो वापरून पपई कापणे हे काम करता येते. आपल्याजवळ जर फक्त खोली व चाकू असले तरी पपई कापता येईल, पण नारळ असेल व तो फोडायला हातोडा लागेल तेंव्हा आपल्या खोलीत एकतर हातोडा हवा, किंवा लेथमशीन ठेवले आहे ते वापरून हातोडा बनवून घ्या व मग नारळ फोडा अशी सोय तरी असली पाहिजे. विण्डोज व लीनक्स सिस्टम मधे हा फरक आहे. लीनक्समधे प्रोग्रामिंगला लागणारी कित्येक उपकरणे सिस्टमसोबतच असतात.  पण ज्यांना तयार हत्यारांमधून नेमके काम करायचे असेल त्यांना विण्डोज OS सोईची आहे.

मशीन लँग्वेज,असेम्ब्लर,कम्पायलर,प्रोग्रामिंग लँग्वेज,व प्रोग्राम यांचे काम वरील हत्यारं, लेथ मशीन, चाकू किंवा हातोडा यासारखे असते. प्रोग्राम वापरून आपण करतो ते काम पपई कापण्यासारखे असते. आपण दिलेला निर्देश संगणक याच प्रक्रियेतून समजून घेत असतो. यासाठी त्याची एक ऑपरेटिंग सिस्टम असावी लागते. तसेच ठराविक कामांचे प्रोग्राम व त्यांच्या निर्देशांची भाषा - प्रोग्रामिंग लँग्वेज असते. केलेले कामही मानवी भाषेच्या रूपाने दिसावे अशी व्यवस्था असते.

थोडक्यांत, संगणकाला दिले जाणारे सर्व निर्देश मानवी भाषेतूनच देता येतात. वरील वर्णनावरून असे समजून येईल की ढोबळ मानाने या निर्देशांचे तीन प्रकार होतात. ऑपरेटिंग सिस्टमचे निर्देश, प्रोग्रॅमचे निर्देश, व प्रत्यक्ष कामासाठी वापरलेले निर्देश.

यातील ऑपरेटिंग सिस्टमचा विकास हा एवढा कळीचा मुद्दा ठरला की डॉस व विण्डोज ऑपरेटिंग सिस्टमचा जनक बिल गेट हा कित्येक वर्ष जगांतील सर्वांत श्रीमंत माणूस राहिला व त्याची कंपनी मायक्रोसॉफ्ट देखील सर्वाधिक श्रीमंत म्हणून नावारूपाला आली.

पुढारलेल्या चिपा वापरुन मायक्रोसॉफट कंपनीने सॉफ्टवेअरच्या विकासात मोठी झेप घेत संगणकावरचे काम चाकोरीबद्ध करत आणले. या चिपा तयार करणाऱ्या कंपन्या वेगळ्या असतात, उदा. इंटेल. 1980 सालच्या सुमारास 8086 चिप उपलब्ध झाली तेंव्हा  मायक्रोसॉफ्ट कंपनीने डॉस ऑपरेटिंग सिस्टम विकसित केली व इतरांनी रिसर्च करून तयार केलेले कित्येक प्रोग्राम उदा. गद्यलेखनासाठी वर्डस्टार, त्याचप्रमाणे बेसिक, कोबोल इत्यादी संगणकीय भाषा, लोटस व स्प्रेडशीट सारखे संख्या गणनात्मक प्रोग्राम वगैरे डॉस ऑपरेटिंग सिस्टम मार्फत वापरणे सुलभ केले. त्यामुळे आता फक्त डॉसचे थोडेसे प्रोग्रामिंग शिकून संगणकाचा वापर करणे शक्य झाले. खूप तरुण मुली-मुले याकडे वळली. संगणक इंजिनियर होण्यासाठी अजूनही संगणकीय भाषांचे, विशेषतः C++ व जावा यांचे विशिष्ट तंत्र शिकावे लागते. पण तसे न करूनही फक्त संगणकीय व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम करून, BCA, MCA, BCS, अशा डिग्र्या घेऊन मोठ्या ऑफिसेसचे संगणकीय काम सांभाळणे हे चांगले करियर ऑप्शन मिळाले.

या पुढचा टप्पा म्हणजे नवख्या माणसाला कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टम मधे सोपेपणाने निर्देश देता यावे म्हणून graphical user interface (GUI), चे तंत्र वापरून खूणचित्रांची पद्धत विकसित केली गेली. त्यानंतरच्या जास्त प्रगत चिप निघाल्यावर मायक्रोसॉफ्टने 1995 मधे डॉसपेक्षा बरीच प्रगत असलेली व खूणचित्र वापरणारी विण्डोज ऑपरेटिंग सिस्टम विकसित केली व त्या जोडीला मायक्रोसॉफ्ट ऑफिस सारखे कित्येक रेडिमेड प्रोग्राम बाजारात आणले. याच वर्षी  टेलीफोन तारांमार्फत मोठया प्रमाणात व जगभरात इंटरनेटही सुरु करण्यांत आले.

या दरम्यान ऑपरेटिंग सिस्टमच्या बाहेरही सॉफ्टवेअरचे प्रयोग व विकास चालूच होते. गूगल - याहू सारख्या इंटरनेट सर्व्हिसेस आल्या. त्यांच्या पाठोपाठ लीनक्सची ऑपरेटिंग सिस्टम आली ज्यामधे रेडिमेड प्रोग्राममधे बदल करू शकणारे कम्पायलर्स पण आहेत. एकदा लिहिलेली माहिती बदलता येऊ नये यासाठी pdf फाईल तयार करणारी acrobat कंपनी, इंटरनेटवरुन पटापट डाऊनलोड करण्यास मदत करणारी get right किंवा orbit कंपनी, झिप-अनझिप करुन फाइली पाठवण्यास मदत करणारे अविष्कार, आपली वेबसाइट डिझाइन करायला मदत करणारे सॉफटवेअर्स अशी कित्येक उदाहरणं देता येतील. त्या शोधांसोबतच इंटरनेटच्या साहाय्याने इतरांच्या संगणकावर विषाणु (व्हायरस) टाकणारे, ते विषाणु शोधून नष्ट करणारे, असे कित्येक शोधही होत राहीले. फेसबुक सारखे पोर्टल, क्लाउडमार्फत डेटा-व्यवस्थापन, अमेझॉनसारखी घरबसल्या खरेदीची सुविधा, इंटरनेट बँकिंग, ऍप तयार करण्याचे सॉफ्टवेअर अशा सगळयांच्या मागे या सुविधांचे अविष्कार करणारी माणसे व त्यांची प्रज्ञा कामाला आली. त्यांच्यामुळे संगणकाचे तंत्र सोपे झाले, किमती कमी झाल्या आणि उपयोग तर इतक्या प्रकारांनी वाढले की आज प्रत्येक सुशिक्षित व्यक्तिला संगणकाचे प्रशिक्षण नसले तरी जाणीव मात्र हवीच.
============================================================
सॉफ्टवेअरचे प्रयोग व विकास होण्यात भारतीय प्रज्ञेचा व तज्ज्ञांचा मोठा हातभार लागला. मात्र ते सर्व टीममधले छोटे सदस्य याच रूपात राहिले. वर उल्लेखिलेली सर्व प्रगत सॉफ्टवेअर्स परदेशी कंपन्यांच्या मालकीची आहेत. अगदी अलीकडे भारतीय मुळाचे अमेरिकन नागरिक अशा कंपन्यांमधे वरिष्ठ पदावर जाऊ लागलेली आहेत. त्या दृष्टीने एक देश म्हणून भारत अजूनही खूप मागे आहे.

--------------------------------------------------------------------------------

No comments: