Saturday, June 13, 2009

भाग -11- संगणक म्हणजे माहीतीचा खजिना

भाग -11
पुस्तकावरून दुरुस्त केले 22-07-2010

संगणक म्हणजे माहीतीचा खजिना --महाजाल आणि जालशोधयंत्रे
अर्थात इंटरनेटवरून सर्चने माहिती घेण्याचे तंत्र

संगणक म्हणजे माहीतीचा खजिना कसा बनतो ते पाहू या. ई-मेल चे संदेश-वहन विशिष्य व्यक्तिसाठी point to point असले तरी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन गूगल, याहू सारख्या कंपन्यांनी अशी सुविधा निर्माण केली ज्याव्दारे आपण अवकाशांत आपल्या स्व:तचा मालकीचा एक माहितीचा ढग तयार करु शकतो व तो तिथे कायमपणे रहातो. त्यांतील माहिती गद्य, पद्य, चित्र, गाणी, व्हिडियो अशा सर्व प्रकारची असते. यासाठी आपल्याला अवकाशांतील जागांचे नियोजन करणाऱ्या तसेच ढग तयार करण्याची सुविधा देणाऱ्या अशा दोन्हीं कंपनींकडे पैसे भरून रजिस्ट्रेशन करावे लागते. त्या आपल्या ढगाला एक पासवर्ड व एक पत्ता देखील देतात. त्याला संकेतस्थळ म्हणतात. आपल्या ढगाला आपण पब्लिक किंवा सार्वजनिक असे  म्हटले असेल तर इतरांना हा पत्ता गाठून तिथे लिहीलेली माहिती वाचता येते किंवा आपण परवानगी देऊ त्याप्रमाणे इतरही कांही कामे करता येतात. मात्र आपल्या ढगावर वैयक्तिक असे वर्णन केले असेल तर तो इतरांना वाचता येत नाही

पासवर्ड वापरून आपण आपल्या माहितीत फेरबदल करतो. म्हणून आपल्या ढगाचा पत्ता इतरांना मुक्तहस्ते द्यायचा पण पासवर्ड नाही द्यायचा. आपला ढग छोट्या आकाराचा असेल (सुमारे 1 गेगाबाइटपेक्षा लहान) व वैयक्तिक स्वरूपाचा असेल तर कित्येक कंपन्या एखादा ढग फुकटही देतात.

या ढगांमधे सगणकाच्या भाषेत वेब साईट, ब्लॉग साईट किंवा पोर्टल असे प्रकार आहेत. गूगल, याहू यांचे स्वत:चे असे ढग तर आहेत. शिवाय ते इतरांच्या ढगांचे प्रबंधन पण करतात. त्यामुळे त्यांना सर्वांचे सार्वजनिक ढग  व त्यातील माहिती पहाता येते. या सुविधेचा वापर करून त्यानी पुढचा टप्पा -- म्हणजे स्वत:ची सर्च इंजिन्स तयार केली. म्हणून जर कोणी गूगल सर्च वर भारत हा शब्द टाईप केला तर ज्या ज्या ढगांवर, ज्या ज्या माहीतीच्या पानावर भारत हा शब्द आला असेल त्या सर्व पानांची एक यादीच आपल्या समोर ठेवली जाते. आजच मी गूगल सर्च वर भारत हा शब्द टाइप केल्यावर संगणकाने मला दाखवले की सगळ्या माहिती ढगांवर मिळून एकूण एक कोटी दोन लाख पानांवर भारत हा शब्द आढळतो व ती यादी शोधून माझ्या समोर ठेवायला गूगलला फक्त 0.21 सेकंद लागले. यातील ज्या पानावर आपण टिचकऊ (क्लिक करू) त्या पानावरची माहिती वाचता येईल.
यावरुन आपल्याला कळेल की. संगणक उघडून त्यावर महाजाल सुरु करुन गूगल सर्च उघडले तर माहितीच्या एका अफाट जगांत नेणारी खिडकी आपल्यासमोर उघडते. आपल्याला हवा असलेला विषय त्यांत लिहायचा की क्षणार्धांत माहिती मिळते. त्यात वृत्तपत्रातील माहिती असते, कांही अख्खे वृत्तपत्रच असते. कित्येक लेखक आपले संबंध पुस्तकच्या पुस्तक स्वतःच्या माहिती-ढगावर टाकून ठेवतात. ते आपण वाचू शकतो. प्रश्न विचारु शकतो. मित्रमंडळ स्थापन करु शकतो.
तर मग चला आणि तयार करा आपापले माहितीचे ढग आणि कळू द्या जगभराला तुमचे विचार.
माहितीच्या ढगासाठी ज्ञानढग किंवा ज्ञानमेघ हा शब्द कसा वाटतो?
--------------------------------------------------------------------

No comments: