Wednesday, June 10, 2009

भाग - 16 -- स्वत:चे पुस्तक

भाग -- 16 tallied as per book 24-07-2010

संगणक म्हणजे स्वत:चे पुस्तक
अर्थात वेबसाइट बनवण्याचे तंत्र
या भागांतील शब्दावली --वेबसाईट = संकेतस्थळ,  होम पेज = स्वागत-पृष्ठ, अपलोड = जालस्थापना

संगणकाचा वापर आपल्या स्वत: लिहिलेल्या किंवा लिहायच्या पुस्तकासारखा करता येतो. त्याला वेबसाईट म्हणतात.
आपण पुस्तक कां लिहीतो? तर आपले विचार जगाला कळावे म्हणून. संकेतस्थळदेखील याच कारणासाठी करतात.

पुस्तक काढतांना आपल्याला एक छान सजवलेले मुखपृष्ठ लागते. शिवाय अनुक्रमणिकाही असते. संकेतस्थळ तयार करतांना मुखपृष्ठ व अनुक्रमणिका या दोघांना एकत्र करुन स्वागत-पृष्ठ (होम पेज) बनवितांत.
याचा अर्थ असा की स्वागत-पृष्ठ थोडे रंगीबेरंगी, कलात्मक, आकर्षक मांडणीचे असे हवे आणि संकेतस्थळावर जी जी माहिती ठेवणार आहोत, त्याची अनुक्रमणिका देखील त्या पानावरच पाहिजे.
तसं पाहिल तर आपण स्वत: सुध्दा उभ्या आडव्या रेघा काढून ब-यापैकी दिसणारे स्वागत-पृष्ठ तयार करु शकतो. पण एखाद्या वेब डिझाइनरने केलेल स्वागत-पृष्ठ केव्हांही जास्त आकर्षक ठरते.
स्वागत-पृष्ठावर काय अनुक्रमणिका लिहावयाची यासाठी आपण एका शासकीय कार्यालयाचे उदाहरण घेऊ या. त्यातील भाग या पध्दतीचे असतील --
- कार्यालयाची सुरुवात होण्याबाबत शासनाचा आदेश
- प्राथमिक माहिती
- माहिती अधिकार कायद्याखालील आवश्यक माहिती
- उद्दिष्ट, दूरगामी योजना आणि संकल्प (objective vision and mission)
- कामांची व योजनांची यादी
- बजेट
- फॉर्म -- (इतरांनी भरायचे असल्यास)
- नवीन कांही-(ही माहिती सतत बदलती राहील)
- संबंधित कायदा, विविध शासन निर्णय
- यशोगाथा
- वार्षिक अहवाल
इत्यादी.
यातील प्रत्येक भागासाठी स्वागतपानावर एखादे छानसे खूणचित्र किंवा शब्द ठरवायचा आणि प्रत्येक भागातील माहितीसाठी एकेक वेगळे पान तयार करायचे..

या पानांना संकेतस्थळावर टाकण्यासाठी आधी आपले संकेतस्थळ असायला पाहिजे. जसे ईमेल पत्त्यासाठी आपल्याला एखाद्या कंपनीकडे नोंदणी करावी लागते, तसेच संकेतस्थळासाठी देखील वेब-डोमेन रजिस्टर करावे लागते. बऱ्याच कंपन्या ही सुविधा देतात. उदाहरणार्थ गूगल कंपनीच्या गूगलपेजेसवर  आपण आपल्या नावांचे संकेतस्थळ रजिस्टर करु शकतो.  वैयक्तिक संकेतस्थळे  कांही किंमत न भरताही मिळू शकतात. मात्र मोठी कार्यालयीन बेबसाईट असेल तेंव्हा वेब-डोमेन रजिस्टर करणा-या एखाद्या प्रतिष्ठित कंपनीकडे पैसे भरुन आपली साईट नोंदवून घेणे आवश्यक.

संकेतस्थळ कसे करतात ? यासाठीआपण कांही रेडिमेड सोपे प्रोग्राम वापरु शकतो. उदाहरणार्थ ड्रीमवीव्हर किंवा मायक्रोसाफ्ट फ्रण्टपेज. हा प्रोग्राम उघडला की आपल्यासमोर एखाद्या वहीच्या आकाराएवढे पान उघडते. त्यामध्ये आपण निरनिराळे आयताकृती भाग पाडायचे. प्रत्येक भागात आपण अनुक्रमणिकेतील एकेक शब्द किंवा खूणचित्र ठेवायचे. रेडिमेड प्रोग्रामच्या मदतीने आपण निरनिराळ्या चौकोनांची बॅकग्राउंड रंगीत करु शकतो- त्यातील अक्षरांचे आकार आणि रूप वेगवेगळे ठेवू शकतो- हेतू हा कि हे पान  जास्त आकर्षक व्हावे आणि आपली वेबसाईट उघडणा-याला ते वाचावेसे वाटावे. असे स्वागत-पृष्ठ तयार करायचे. मग नवनवीन पाने उघडून त्या पानांवर  एकेका भागाचे शीर्षक आणि संपूर्ण माहीती ठेवायची. मग प्रोग्रामच्या सहाय्याने आपले स्वागतपृष्ठ व ही सर्व पाने अपलोड करायची आणी स्वागत-पृष्ठावरील त्या त्या शब्दाला ते ते पान हायपरलिंकने जोडायचं. लिंक म्हणजे जोडणे आणि हायपरलिंक म्हणजे संकेतस्थळावरील पाने महाजालाच्या मदतीने जोडणे. जसं आपण अनुक्रमणिकेतील एखादा भाग वाचावासा वाटला की समोर नमूद केलेले पृष्ठक्रमांक पाहून पान नेमकं उघडतो, तसेच स्वागतपृष्ठावरील एकेका शब्दावर टिचकावले की ते ते हायपरलिंक केलेले पान उघडते. गंमत म्हणजे असे पान तयार करून झाले नसले तरी फक्त शीर्षक टाकलेले पानही जालस्थ (अपलोड) करता येते. म्हणजे आधी प्रत्येक पानाला एक  पत्ता मिळून ते स्वागत-पृष्ठाला जोडता येते. त्या पानावर  शीर्षकाखाली - "क्षमा करा, अजून इथली माहिती तयार नाही" असे लिहून ठेवावे. नंतर आपल्याला वेळ मिळेल तसतसे एकेक पान पूर्ण करून पुन्हा जालस्थ केले तरी त्याचा पत्ता तोच रहात असल्याने स्वागतपानावर काही बदलावे लागत नाही. तसेच वेबसाईट अपलोड झाल्यावर त्यामधील कांही पानांचा मजकूर चुकीचा वाटला किंवा अपटूडेट करावा लागला तर तसे करता येते.

आपल्या संकेतस्थळाबद्दल लोकांनी आपल्याला ईमेल ने सूचना द्याव्या असे वाटत असेल तर स्वागतपृष्ठावर एक चौकोन- व त्यांत "आम्हाला कळवा" असे शब्द लिहून आपल्या ईमेल पत्त्यावर हायपरलिंक करायचे. तसेच आपले संकेतस्थळ किती जणांनी पाहिले ते कळण्यासाठी स्वागतपृष्ठावर एक काऊंटर लावून ठेवता येतो. इकडे एखाद्याने आपली साईट उघडली की काउंटर वर पुढचा आकडा मोजला जातो.

सरकारी कार्यालयांमध्ये बहुधा संकेतस्थळ बनवण्याचे काम एखाद्या वेबडिझाइनरला देतात. मला खूपदा पहायला मिळते की एखाद्याला असे काम दिले, त्या व्यक्तीने वेब रजिस्ट्रेशन स्वतच्या नावांने केलं, तसच पासवर्ड इत्यादी सर्व माहिती स्वतः कडे ठेवली. वेब-साईटचे काम पूर्ण झाले, उद्घाटन वगैरे सोहळेही झाले, आणि पुढे फारसे काम उपलब्ध नाही म्हणून करारपत्र रद्द झाले. मग लक्षांत आले की, वेबसाईट हरवली. कारण डिझाइनरने करार संपताच ती पुसून टाकली होती. या व अशा चुका सरकारी कार्यालयांनी टाळल्या पाहिजेत.

आता तर माहितीच्या अधिकाराचा कायदा आल्यामुळे सर्व सरकारी कार्यालयांनी संकेतस्थळ तयार करून त्यावर माहिती ठेवणे आवश्यक झाले आहे.

म्हणूनच मग संकोच कशाला? आपले एखादे छोटेसे तरी संकेतस्थळ इंटरनेटवर टाकून पाहिलेच पाहिजे. आणि आतातर थोडे कमी प्रतीचे पण अगदी सोपे असे ब्लॉग-पानही उघडून चालते. त्याची माहिती पुढील भागात.
------------------------------------------------------------------------------------
हायपरलिंकचा वापर किती सोपा आहे ते कळण्यासाठी एक प्रयोग करा. वर्ड हे सॉफ्टवेअर उघडून त्यांत तीन चार परिच्छेद लिहा -- मग एखादा शब्द निवडून मेनु-बार वरील हायपरलिंकच्या आयकॉन वर क्लिक केले की संगणक आपल्याला विचारतो -- कुठे जोडू - त्यांला उत्तर दिले परिच्छेद चार, की लगेच त्या शब्दाचा रंग पालटून निळसर होतो. त्यानंतर कधीही त्या शब्दावर क्लिक केल्याने परिच्छेद चार उघडेल. या प्रयोगांत आपल्या समोर असलेल्या पानावरच हायपरलिंक तयार होते, पण संकेतस्थळ करतांना आपण नवीन पानाचा पत्ता देतो.

No comments: