Wednesday, June 10, 2009

भाग - 22- पेपर सेटर

भाग - 22
संगणक म्हणजे पेपर सेटर
(पुस्तकाप्रमाणे तपासले -done)
आपल्या परीक्षा पद्धतीत तात्विक आणि व्यावहारिक या दोन्ही पातळीवर खूप सुधारणा होण्याची गरज आहे. यातील खूपशा व्यावहारिक सुधारणा संगणकाचा उपयोग करून अगदी सोप्या पद्धतीने करता येतील. यामुळे कोट्यावधी विद्यार्थी व पालक आणि लाखो शिक्षक व परीक्षेची जबाबदारी उचलणा-या कर्मचा-यांची सोय होईल. फक्त आपल्या लक्षांत यायला हवे की खरेच असे करायला कांय हरकत आहे?

आपण चवथी गणिताच्या परीक्षेचे उदाहरण पाहू या. या पेपरांत जर दहा प्रकारची गणितं विचारली जात असतील तर त्या प्रत्येक प्रकारासाठी शंभर शंभर गणितांची एकेक प्रश्न मंजूषा तयार करायची. हे सगळे प्रश्न संगणकाकडे एका फाइल वर ठेऊन द्यायचे (हजार प्रश्न). आता संगणकाला एक प्रोग्राम असा शिकवायचा की आपण सांगू तेंव्हा त्याने प्रत्येक प्रकारातून कुठलेतरी एक, मात्र प्रत्येक वेळी नवे - अशी दहा गणितं निवडायची अणि आपल्याला एका कागदावर छापून द्यायची. की झाली आपली प्रश्नपत्रिका तयार. ती आपण परीक्षेच्छु विद्यार्थ्याला सोडवायला द्यायची अणि नंतर शिक्षकांकडून तपासून घेऊन त्याचे मार्क ठरवायचे. अशा प्रकारे चट के पट कुणाचीही परीक्षा घेता येईल.

य़ांत कित्येक सोई आहेत. दरवर्षी पेपर सेट करा, त्याची कडेकोट गुप्तता पाळा, ते कोट्यावधी पेपर वेळेत छापून घ्या आणि निरनिराळ्या केंद्रांपर्यंत पोचवा ही सगळी कटकट संपेल. पेपर फुटण्याचा धोका संपेल. सगळ्यांचे टेन्शन जाईल. याचे फायदे पण मोजूया.

(1) ही प्रश्न मंजूषा संगणकावरच न ठेवता माहितीच्या ढगांत ठेवली आणि शिवाय तिथे प्रश्नपत्रिका तयार करू‏न देण्याची सोय देखील ठेवली तर विद्यार्थी कधीही स्वत:ची परिक्षा घेऊन आपला आत्मविश्वास वाढवू शकतात.
(2) विद्यार्थ्यासाठी दर महिन्यात परिक्षा घेण्याची सोय होऊ शकते. लाखो करोडो विद्यार्थी एकाच दिवशी परिक्षेला बसण्याऐवजी ज्यांना जशी हवी तशी परिक्षा दिल्याने सर्वाचेच टेन्शन कमी होईल.
(3) जिथे फक्त (Objective) प्रश्न असतील आणि विद्यार्थ्याने फक्त चारपैकी एका पर्यायावर खू‌ण करायची एवढेच असेल अशा परीक्षा हल्ली हमखास संगणकावरच होतात. पण आपल्या सध्याच्या पध्दतीतील प्रश्नपत्रिका देखील या पध्दतीने तयार होऊ शकते. फक्त पेपर लिहिणे आणि तपासणे पूर्वीच्या पद्धतीने चालू राहील.

याकडे अजून आपल्या विविध परीक्षा घेणा-या बोर्डाचे लक्ष गेलेले नाही, ते लवकर जावो, हीच सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा.
शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्या मराठी व हिन्दीच्या परीक्षा भाषा-संचालनालयामार्फत घेण्यांत येतात. तिथे ही पद्धत अर्धी अंमलात येत आहे. म्हणजे त्यांची प्रश्नमंजूषा व संगणक कार्यक्रम तयार होऊन त्यांतूनच प्श्नपत्रिका तयार होते. मात्र थेट परीक्षा-केंद्रावरच पेपर छापून घेण्याची सुविधा अद्याप सुरू करता आलेली नाही.

---------------------------------------------------------------------------------

No comments: