Saturday, June 13, 2009

भाग -- 10 --- संगणक म्हणजे सुपर संदेशवाहक

भाग -- 10 पुस्तकाप्रमाणे तपासले 22-07-2010
संगणक म्हणजे सुपर संदेशवाहक
इंटरनेट -महाजाल

संगणकावर महाजालाद्वारे जगभर फाईली पाठविण्याचा शोध 1983 मधे लागला. त्यासाठी आधीच्या तीन शोधांची मोठी मदत झाली.
पहिला खूप आधीचा शोध लाउडस्पीकरचा - म्हणजेच आपण बोललेला आवाज इलेक्ट्रिक सिग्नल मधे बदलता येतो हा तो शोध. या उपकरणाला मायक्रोफोन म्हणतात. मग तो इलेक्ट्रिक सिग्नल मोठा करायचा आणि पुन्हा त्याचे रूपांतर आवाजांत करून हा मोठा आवाज लोकांना ऐकवायचा.
1885 च्या आसपास जगदीशचंद्र बोस व मार्कोनी या वैज्ञानिकांनी दुसरा शोध लावला. रेडियो तरंगांच्या सहाय्याने इलेक्ट्रिक संदेशांना (पर्यायाने ध्वनि संदेशांना देखील) एका जागेवरुन दुसरीकडे आवाज किंवा संदेश पोचवण्याचं तंत्र त्यांनी शोधल होतं. त्यातूनच पुढे रेडियोचा जन्म झाला. रेडियोसाठी प्रसारण करणा-या आकाशवाणी केंद्रांवरुन तिथले कार्यक्रम रेडियो तरंगाच्या सहाय्याने अवकाशात पाठवतात. त्याचवेळी आपण आपला ट्रान्झिन्टर ट्यून केला असेल तर तो या रेडियो तरंगांना पकडतो, आणि मूळ केंद्रावर चालणारा कार्यक्रम आपल्याला जसाच्या तसा ऐकवतो. पण तो क्षण निघून गेल्यावर आपण तो कार्यक्रम ऐकू शकत नाही. म्हणूनच आकाशवाणी केंद्रावर सहा वाजता लागणारा कार्यक्रम आपण सात वाजता ऐकू शकत नाही. याला रियल टाइम किंवा ऑन-लाईन अप्रोच म्हणजे “ज्या च्या त्या क्षणाला” असे नांव आहे. (हुषार लोकांनी त्यावर तोडगा काढलाच- की सहा वाजता लागलेला कार्यक्रम कुणाला तरी रेकॉर्ड करुन ठेवायला सांगायचे आणि मग तो सावकाश ऐकायचा.)
तसेच या पध्दतीला “ब्रॉडकास्ट पध्दत” असे नांव आहे. कारण केंद्रावरील ट्रान्समिशन ताबडतोब दाहीदिशात पसरते आणि कुणीही ते ऐकू शकतो. सर्वांसाठी खुले!

त्याच्या थोडे आधी म्हणजे 1876 मधे अलेक्झांडर ग्राहम बेल (Alexander Graham Bell) ने टेलिफोनचा शोध लावला होता. त्यामध्ये एका यंत्रावर बोललेले स्वर लगेच इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये बदलतात, आणि टेलिफोनच्या तारेतून दुस-या टोकाला किंवा लांबच्या गावांला पोचतात. तिथल्या रिसीव्हर मध्ये ते पुनः स्वरांच्या रुपाने तिकडच्या माणसाला ऐकू येतात. हे देखील ऑन-लाईनच असते.

यात महत्वाचा मुद्दा असा की फोनवरील संदेश-वहन एका विशिष्ट फोन नंबर वरुन दुस-या विशिष्ट फोन नंबरवरच जाऊ शकते - ते सर्वाना खुले नसते कारण ते ब्रॉडकास्ट पद्धतीने नसते. संदेश पाठवणा-याचा पत्ता (महणजे फोन नंबर) माहीत असतो आणि ज्याला पाठवायचे त्याचा पण फोन नंबर सांगावा लागतो. याला point to point संदेशवहन म्हणतात.
फोनचे संदेशवहन जगभर जाणे गरजेचे असल्याने गेल्या शंभर-सव्वाशे वर्षांत समुद्रातून, जमीनीखालून, जमीनीवरुन असे तारांचे जाळेच जगभर विणले गेले. त्यासाठी अल्युमिनियमच्या तारा, तांब्याच्या तारा यासोबत काचेच्या तारा - ऑप्टिक फायबरचा वापर करण्यात आला. ऑप्टिक फायबरची क्षमता व त्यातील संदेशवहनाचा वेग इतर तारांपेक्षा कितीतरी हजारपट अधिक असतात. असे तारांचे जाळे विणणा-या कंपन्या जगांतील अति श्रीमंतांच्या यादीत असतात. संगणकासाठी देखील याच तारा वापरल्या जातात.

यावरुन आपल्या लक्षांत येईल की, सुरुवातीच्या काळापासून संदेश पाठविणा-या दोन त-हा विकसित झाल्या. एका विशिष्ट पत्त्यावरुन दुस-या पत्त्यावर संदेश पाठविणे -- जो फक्त त्याच व्यक्तीला घेता येईल अशी एक पद्धत. फार पूर्वीपासून चालत आलेली टपाल खात्याने पत्र पाठविण्याची पध्दत याच प्रकारची होती हे तुमच्या लक्षात आले असेलच. मात्र टपालाला पोचायला वेळ लागतो ही गैरसोय तर येणारे पत्र हे ऑफ-लाइन म्हणजे ज्याला मिळाले त्याने त्याच्या सोयीने थोडाफार उशीर करून वाचावे असे असते, ही मोठी सोय. ते त्याने वाचले की नाही हे कळायला मार्ग नसतो ही गैरसोय.
दुसरी त-हा म्हणजे ब्रॉडकास्ट पद्धतीने एकाचवेळी कोण्या एका संपूर्ण क्षेत्रात ऐकता येईल अशा पद्धतीने प्रसारित करणे. रेडियो किंवा दूरदर्शनवरुन येणारे संदेश ब्रॉडकास्ट पद्धतीचे म्हणजे कुणीही ऐकावे असे असतात -- पण ऑन लाइन -- म्हणजे ज्या क्षणी ते पोहोचतात त्याच क्षणी ऐकावे लागतात.
संगणकात या दोन्ही सोयीचा मेळ घातलेला आहे. जाणारी ई-मेल टेलिफोनच्या तारांमधून जात असल्याने लगेच पोहोचते. ती point to point पध्दतीची असते, म्हणजे ज्याच्या पत्त्यावर ई-मेल पाठविली त्यालाच ती मिळते, मात्र सोयीने केव्हांही वाचता येते. मोबाइल फोन वर तिथल्या तिथे बोलले जाते पण SMS वर संदेश आल्यास सावकाश वाचता येतो मोबाईल चे संदेशगमन देखील point to point असते. मात्र टेलिव्हजनचे संदेशगमन ब्रॉडकास्ट पध्दतीने असते.


ई-मेल चा प्रवास रेडियो तरंग आणि सॅटेलाइट वरुन तर काही प्रवास तारांमधून होतो
संगणकावरून वाईड एरिया नेटवर्क द्वारे लांबवर फाईली पाठविण्याची सुविधा 1983 मधेच आली. मात्र सामान्य माणसांना सोपेपणाने इंटरनेट वापरणे 1995 पासून शक्य झाले.
----------------------------------------------------------



                  














No comments: