Tuesday, April 7, 2009

भाग--9 संगणक म्हणजे कपाट

भाग- 9
संगणक म्हणजे कपाट
(पुस्तकाप्रमाणे तपासले 22-07-2011)
या भागांतील शब्दावली -- फाइल= धारिका; फोल्डर = संचिका; हार्ड डिस्क = संग्राहक; प्रोसेसर = विवेचक.
चिप -चकती, पट्टी, फीत-??
रिलोड -पुनर्स्थापना 
अपलोड- जालस्थापना 
डाऊनलोड-स्थलस्थापना 

आपल्या कपाटात बरेच कप्पे असतात आणि आपण त्यामध्ये आपल्या सोयीने वर्गवारी करुन वस्तू ठेवतो. त्यातला एखादा कप्पा आपण कुलूपबंदपण करुन ठेवतो. शिवाय कपाटात आपण कांही गाठोडी बांधून ठेवतो व प्रत्येक गाठोडयात ब-याच गोष्टी असतात. संगणकावर तेच करायचे असते.

यासाठी संगणकावरील प्रोग्राम, फाइली आणी फोल्डर या तीन गोष्टी समजावून घेऊया. प्रोग्राम हे कांही तज्ज्ञ मंडळींनी विकसित केलेले तंत्र असते व खास-खास कामांसाठी खास प्रोग्राम करतात. तसेच खूपसे स्टॅण्डर्ड प्रोग्रामही आहेत. यांचा वापर करून आपण जी कामें करतो त्यातून वेगवेगळ्या फाइली (धारिका) तयार होत असतात. संगणक प्रत्येक वेळी आपल्याला विचारतो की ही फाइल कुठे ठेऊ त्यांना एकत्र ठेवायचे असेल तर संगणकांत विषयवार फोल्डर (संचिका) तयार करायचे आणि हव्या त्या फाइली त्यांत ठेवायच्या.

संगणकाचा कारभारी डबा म्हणजेच प्रोसेसर बॉक्स आपण उघडून बघत नाही. हार्डवेअर शिकणारे किंवा शिकलेले विद्यार्थी बघतात. (तस आपणही बघू शकतो म्हणा, कारण निव्वळ एका स्क्रू ड्रायव्हरने डब्याचे एका बाजूचे दारं उघडता येते) त्याच्या आत वेगवेगळी कामं करण्यासाठी वेगवेगळ्या पीसीबी (प्रिंटेड सर्किट बोर्ड)वर चिप्स, सर्किट्स वगैरे वगैरे असतात. त्यातला सर्वांत प्रमुख भाग म्हणजे काम करण्यासाठी मेंदू -- म्हणजे प्रोसेसर चिप. या मेंदूला स्वतःच्या कामामधील तात्पुरती माहिती साठवायला लागणारी पाटी म्हणजे रॅम(RAM) आणि कामाच्या फाइली कायमस्वरूपी जपून ठेवण्यासाठी लागते ती हार्ड डिस्क. ही हार्ड डिस्क म्हणजेच कपाट. प्रोसेसरला विवेचक आणि हार्ड डिस्कला संग्राहक असे छान मराठी शब्द वापरता येतील.

आपण संगणक विकत घेतानाच आपल्याला किती मोठी हार्ड डिस्क घ्यायची ते ठरवतो. जेंव्हा विक्रेत्याचा इंजिनियर आपल्याला सुरुवातीचे सेटिंग करुन देत असतो, तेव्हांच त्याला हार्ड डिस्क चे दोन किंवा तीन भाग करायला सांगायचे. या भागांना C, D, E, अशी नांवं देण्याची पद्धत असून C drive मध्ये सर्व प्रोग्राम ठेवण्याची पद्धत आहे. त्याच्यांत कधी कधी बिघाड होतो. अशावेळी सी-ड्राईव्ह पूसून टाकायचा. सर्व स्टॅण्डर्ड प्रोग्राम्सच्या प्रमाणभूत सीडी बाजारात मिळतात. त्यावरून पुन्हा सर्व प्रोग्राम्स सी-ड्राईव्हवर रिलोड करता येतात म्हणजेच आणून बसवता येतात. यासाठी आपण केलेल्या कामांच्या फाईली C drive वर न ठेवता D drive वर ठेवायच्या, म्हणजे सी-ड्राईव्ह पुसला तरी फाइली सुरक्षित रहातात.
माय डाक्यूमेंट असा एक कप्पा  सी-ड्राईव्हवर असते. आपण नव्या केलेल्या फाइलींना संगणक  सामान्यपणे तिथेच साठवतो. म्हणून मधून मधून त्या फाईली डी ड्राईव्हवर नेऊन ठेवल्या की सुरक्षित राहतात.

कपाटात आपण कधी कधी एकाच विषयाच्या खूपशा गोष्टी एका गाठोड्यात बांधून ठेवतो व हव तेंव्हा ते गाठोडच हलवतो. तोच प्रकार संगणकात करता येतो. संगणकाला नवी संचिका – न्यू फोल्डर उघडायला सांगायचे आणि हव्या त्या धारिका (फाइली) किंवा इतर संचिका (गाठोडी) त्यांत नेऊन ठेवायच्या. त्या संचिकेला आपल्या सोइचे नांव द्यायचे. अशी ही संपूर्ण संचिका गाठोड्यासारखी फक्त एका सूचनेने दुस-या ड्राईव्ह मध्ये नेऊन ठेवता येते. म्हणजे प्रत्येक फाइल न फाइल उचलून ठेवावी लागत नाही.
इंटरनेट द्वारे फक्त फाइली पाठविता येतात. संचिका पाठवता येत नाही. मात्र संचिकेला Zip केले की त्याची एक झिप फाईल तयार होते- ती इंटरनेटवर पाठवता येते. ज्याला मिळेल त्याने आपल्या संगणकावर ती फाईल उतरवून घ्यायची आणि अनझिप करायची (म्हणजे गाठोडे उघडायचे) की त्या सर्व फाइली चुटकीसरशी त्या संगणकावर उपलब्ध होतात.

अजून एक महत्वाची बाब- कपाटात आपण एखाद्या छोट्या कप्प्याला कुलूप लावू शकतो किंवा पूर्ण कपाटालाच. तसच आपण एखाद्या फाइलला, किंवा फोल्डरला किंवा ड्राईव्हला किंवा पूर्ण संगणकालाच वेगवेगळी कुलूप लावू शकतो. त्या कुलूपाच्या किल्लीला पासवर्ड म्हणतात. तो पासवर्ड दिल्याशिवाय कुणालाही ती फाईल उघडता येत नाही. या आणि अशा इतर ब-याच पध्दती वापरुन संगणकावरचे काम गोपनीय व सुरक्षित ठेवले जाऊ शकते.

सामान्य कामांसाठी आपल्याला एवढी सुरक्षा बाळगण्याची गरज नसते. मात्र जिथे बॅंकांचे व्यवहार होतात, गोपनीय कागद साठवावयाचे असतात, किंवा जिथे एखाद्या फॅक्टरीचे उत्पादन क्षणोक्षणी संगणकाने कण्ट्रोल करतात, तिथे अशी सुरक्षा अत्यावश्यक असते.
==============================================
नवे फोल्डर --
संगणकात नवे फोल्डर कसे उघडायचे? तर पडद्यावरील रिकाम्या जागेत कुठेही राईट क्लिक केले की
कामांची एक यादी उघडते त्यामध्ये न्यू या शब्दावर उंदीर न्यायचा -- की आपल्याला फोल्डर असा पर्याय दिसतो, तिथे टिचकवले की एक डेस्कटॉपवर एक New folder तयार होऊन समोर दिसते. या संचिकेला हवे ते नांव देऊन टाकायचे व नंतर आपल्याला हव्या त्या धारिका (फाइली) या संचिकेत आणून ठेवायच्या.
सर्व्हर --
कामाच्या सोईसाठी आपण खूपसे संगणक एकत्र जोडू शकतो. ते एकाच इमारतीत असतील तेंव्हा जोडणीच्या पद्धतीला लॅन (LAN- Local Area Network) म्हणतात आणि खूप लांब-लांब --शहराच्या विरुद्ध टोकाला, इतर शहरांत, किंवा इतर देशांत, असतील तेंव्हा जोडणीच्या पद्धतीला वॅन (WAN- Wide Area Network) म्हणतात.
या दोन्ही प्रसंगी जोडलेल्या सगळ्या संगणकांमधून एखाद्याला मुख्य संगणक असे ठरवले तर कामात खूप सोय होते.  साहाजिकच त्याचा संग्राहक बराच मोठा घ्यावा लागतो. अशा प्रमुख नेमलेल्या संगणकाला सर्व्हर म्हणतात.
-------------------------------------------------------------------

No comments: