Friday, April 10, 2009

भाग -- 15 संगणक म्हणजे खिडक्याच खिडक्या

भाग -- 15 tallied with book 22-07-2010
संगणक म्हणजे खिडक्याच खिडक्या

हे वर्णन कांही शंभर टक्के बरोबर नाही. पण सामान्य माणसाला आपल्या नित्यनियमित कामांसाठी सोईचा असा संगणक १९९५ च्या सुमारास जगभराच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणांत आला. त्यात वापरलेल्या पध्दतीला आपण खिडक्यांची पध्दत म्हणू शकतो.

आपल्या घराला भरपूर खिडक्या असतात. एक खिडकी उघडली की एक दृश्य दिसतं- दुसरी उघडली की दुसरं दृश्य दिसत. संगणकावर पण आपण हव तर एकच खिडकी उघडायची किंवा एकाच वेळी सात-आठ पण उघडू शकतो. एक खिडकी म्हणजे एक प्रोग्राम किंवा एक काम. या खिडक्यांचा आकार लहान मोठा करता येतो, अगदी एका बिंदुएवढा सुध्दा. म्हणजे संगणकाच्या पाटीवर आपल्याला हव्या तितक्या खिडक्या उघडून काम करता येते. एका खिडकीत जाऊन तिथल्या प्रोग्राम चे काम सुरु करायचे मग ती खिडकी छोटी करुन ठेवायची, संगणक तिथले काम करीत राहतो. तोपर्यंत आपण दुसरी खिडकी उघडून तिथले काम सुरु करुन संगणकाला कांय त्या सूचना द्यायच्या. अशात-हेने एकाचवेळी खूप कामं करत रहायची- एखाद्या मोठ्या कंपनीच्या टॉप एक्झिक्यूटिव्ह प्रमाणे! याला मल्टीटास्किंग असे छान नांव पडले.

या खिडक्यांची अजून एक गंमत आहे- खिडक्या उघडणे, मिटणे, लहान मोठी करणे, त्यावर केलेले काम जपून ठेवणे, ते काम नको असेल तर कचराकुंडीत टाकणे, या सर्व प्रकारची कामं सगळ्या खिडक्यांवर एकाच पध्दतीने करतात, त्यामुळे एकदा का या कामांची सवय झाली की आपल्या डोक्याला फार विचार करावा लागत नाही.

संगणकावर स्टार्ट बटणावर राइट क्लिक केले की, एक नवा मेनू उघडतो, त्यापैकी एक्सप्लोअर या शब्दावर क्लिक केले की आपल्याला संगणकातील सर्व ड्राईव्हस्, संचिका, धारिका (फाईली), आणि प्रोग्राम्स ची अनुक्रमणिका वाचता येते. तसेच आपण एखादा ड्राईव्ह किंवा संचिका उघडायला सांगितले की अजून एक खिडकी उघडून त्यामध्ये असलेल्या संचिका, धारिका, आणि प्रोग्रामची अनुक्रमणिका दिसते. त्यांतील हवी ती धारिका आपण उघडून, वाचू शकतो किंवा काम करू शकतो. त्याच वेळी ब्राउझर उघडला तर एक वेगळी खिडकी उघडून त्यावर अंतर्जालाची कामं करता येतात.

विंडोज ऑपरेटिंग सिस्टम सारख्याच ज्या इतर जास्त सोईच्या ऑपरेटिंग सिस्टम बाजारात उतरत आहेत (उदा. लीनक्स किंवा ऍपल कंपनीची मॅक) त्या सुध्दा खिडक्यांची ही पध्दत वापरतात.


संगणक बंद करायच्या आधी आपण उघडलेल्या सर्व खिडक्या बंद करुन मगच संगणकाला शट डाऊन म्हणजे बंद हो असे सांगावे.
--------------------------------------------------------------

No comments: