Sunday, February 22, 2009

संगणक पदनाम कोष

संगणक पदनाम कोष
संगणकाचा अभ्यास करतांना संगणकाच्या वेगवेगळ्या भागांची नांवे माहिती करुन घेणे आवश्यक आहे.
संगणकाकडे स्मरणशक्तीचा प्रचंड साठा असतो. त्या साठ्यामध्ये आपल्याला पुढे, मागे किंवा नेहमी लागणारी माहिती ठेवता येऊ शकते. संगणकामधील माहितीचा साठा करुन ठेवणारा भाग म्हणजे मेमरी स्टोरेज अथवा संग्राहक आणी गणितीय किंवा साठवलेल्या माहितीची उलाढाल करणारा भाग म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट किंवा मेन मेमरी किंवा विवेचक. यापैकी माहिती संग्राहकाला हार्ड डिस्क म्हंणतात. कुठल्याही संगणकाचे वर्णन सांगताना, त्याची संग्रहण क्षमता 100 GB - गीगाबाईट आहे असा उल्लेख असतो. संग्राहकातून थोडी थोडी माहिती काढून दुस-या संगणकावर वापरता यावी यासाठी लहान संग्रहण क्षमता असणारी वस्तू हवी. पूर्वी फ्लॉपी डिस्क वापरत तिची क्षमता फार तर हजार KB - किलोबाईट असे. आता 1 गीगाबाईट क्षमता असणारी पेन ड्राईव्ह वापरतात. याशिवाय संगणकामधील माहितीची जादा प्रत असू द्यावी यासाठी मॅग्नेटिक टेप, सीडी, डीव्हीडी इत्यादी वापरतात.

संगणकाच्या आतील भागात अत्यंत सुक्ष्म शक्तीच्या विद्युतधारा प्रवाहित होत असतात. 1885 च्या आसपास मार्कोनी ने वायरलेस चा अविष्कार व टेलीग्राफी आणली तेव्हा मोर्स कोडमध्ये सर्व संदेश फक्त डॉट आणि डॅश यांचा वापर करुन दिले जात. ज्यांनी पन्नास वर्षापूर्वी पोस्टात जाऊन टेलीग्राम कसा पाठवतात हे पाहिलं असेल त्यांना आठवेल. तोच प्रकार संगणकाचा.संगणकाला शिकवलेले असते की विद्युतधारा नसेल तेव्हां शून्य(०) वाचायचे व विद्युतधारा असेल तेव्हा त्याला १ वाचायचे. या प्रत्येक स्थितीला एक बिट असे म्हणतात. असे आठ बिट एकत्र करुन वाचले, तर मात्र आपण त्यातून शून्य किंवा एकाच्या पलीकडील अर्थ काढू शकतो. उदाहरणार्थ, 00000001 हा पॅटर्न म्हणजे A. 00000010 म्हणजे बी,00011010 म्हणजे झेड असा अर्थ लावला जाऊ शकतो. अशा एका पॅटर्नला एक "बाईट" म्हणतात. एक किलो बाईट म्हणजे १०२४ बाईट. पण सुटसुटीतपणासाठी त्यांचा उल्लेख हजार बाईट असाच करतात. तसेच एक मेगाबाईट म्हणजे १०००× १००० (प्रत्यक्षात १०२४× १०२४) बाईट, तर एक गेगाबाईट म्हणजे १०००× १०००× १००० (किंवा १०२४ × १०२४× १०२४) बाईट. एक अक्षर किंवा एक एक आकडा किंवा एक खूण (इत्यादी) एका बाईटने दर्शवितात. अशा प्रकारे जुन्या काळी (सुमारे ५० वर्षापूर्वी) संगणकाची सुरुवात झाली.
संगणकाचे बाह्यदर्शी भाग म्हणजे की-बोर्ड, स्क्रीन आणि प्रिंटर, पैकी की-बोर्ड हा इतर सर्व टाईपरायटरच्या की-बोर्डप्रमाणेच असतो व त्यात कांही जास्त की असतात. आपणाला हवी असलेली माहीती आपण स्क्रीनवर वाचू पाहू शकतो. स्क्रीनवरील माहिती आपल्याला वेगळ्या कागदावर टाईप करुन हवी असते, त्यासाठी संगणकाला प्रिंटर जोडलेला असतो. फार पूर्वी प्रिंटरवरची अक्षरे ठिपक्यांच्या पध्दतीने उमटत असत, त्याला डॉट मॅट्रिक्स प्रिंटर म्हणतात. याचा वेग खूप कमी असे, परंतु आता पुढील रेंजचे वेगवान प्रिंटर येऊ लागलेत.
कॅरॅक्टर –
संगणकाला फक्त विद्युत धारा असणे किंवा नसणे या दोनच अवस्था कळतात. अशा एका अवस्थेला एक बिट म्हणतात व प्रत्येक बिट हे ० किंवा १ यापैकी कुठल्यातरी एका आकड्याने दर्शविले जाते, परंतु अशी ८ बिट्स मिळून एक निश्चित अक्षर बनवतात. प्रत्येक अक्षराला अल्फा कॅरॅक्टर व १,२,३......९.० पर्यंत आकड्यांना न्यूमिरिक कॅरॅक्टर म्हणतात. याशिवाय भाषेत वापरल्या जाणा-या सामान्य चिन्हांसाठी सुध्दा एक एक बाईट किंवा कॅरॅक्टर वापरतात.
उदा. :,-‘’():/.
इथे हे लक्षांत ठेवले पाहिजे की आपण आकडा लिहिला तर संगणकाला कळले पाहीजे की त्याचा वापर गद्यलेखनाचा एख भाग म्हणूव झाला आहे की गणितासाठी झाला आहे. हे समजले तरच तो गणिती उलाढाल करू शकतो.

की-बोर्डवर ही अक्षरे दाबली की संगणकाच्या आत नेमके कसे बिटस किंवा बाईटस निर्माण होतील हे ऑपरेटिव्ह सिस्टम व संगणक हार्डवेअर बनत असतानाच ठरते. जगभर याची पद्धत एक नव्हती तेंव्हा एका संगणकाचे काम दुस-याला सांगायला त्रास होऊ लागला. तेंव्हा इंग्रजीसाठी जगभर एकच पद्धत असेल असे सर्वांनी मिळून ठरवले आहे. भारतीय भाषेची सॉफ्टवेअर करणा-याची मात्र अजूनही दहा दिशांना दहा तोंडे आहेत आणी सरकार त्याबद्दल अजन तरी काही करू शकलेले नाही.
प्रोग्राम
प्रोग्राम म्हणजे काय, तर एका पाठोपाठ एक नेमकी काय कृती करायची याची सुसंगतवार यादी करुन संगणकाला देणे. उदा. आपल्याला टक्केवारीची दहा गणिते करायची आहेत. तर प्रोग्राममध्ये १० गणितांसाठी जे दहा मूळ आकडे व टक्केवारी असतील, ते संगणकाच्या "मास्टर फाईल" नावाच्या एका वेगळ्या फाईलमधे भरुन ठेवायची.हे झाले म्हणजे "डाटा फीडींग". टक्क्वारीची गणिते कशी करतात तो फॉर्म्यूला पण संगणकाच्या विवेचकाला आधीच सांगून ठेवलेला असतो. प्रोग्राम सुरु करण्याची सूचना देताच, आपल्याला पुढे वारंवार कांही न विचारता मास्टर फाईलमधून आपोआप आकडे व टक्केवारी घेतली जाते व आपल्याला उत्तरे काढून मिळतात.
याचप्रकारे रोजगार विनिमय केंद्रांमधील उमेदवारांची नांवे, वय, तालुका, जिल्हा, शिक्षण, जात वगैरे माहिती विविध स्वरुपात मिळू शकते.
-----------------------------------------------------------

No comments: