Sunday, February 22, 2009

भाग 14-- मायेचा ओलावा

भाग 14  (पुस्तकाप्रमाणे तपासले 24-07-2011
संगणक म्हणजे मायेचा ओलावा

सन १९९७ ची गोष्ट. मायक्रोस़ॉफ्टची विंडोज ऑपरेटिंग सिस्टम भारतीय बाजारात येऊन दीड-दोन वर्ष झाली होती. सरकारी कार्यालयांना नवीन गोष्टी शिकायला हा काळ खूप म्हणजे खूप अपूरा होता. तिथे अजूनही संगणकांवर डॉस सिस्टम होती. तिच्या मार्फत काम करायचे तर थोडे प्रोग्रॅमिंग यायला हवे. मग सरकारी लोक बिचकतात. ते म्हणतात, "आम्हाला सांगू नका. आम्ही कोणी तज्ञ्ज्ञ नाही. आणा कुणीतरी तज्ञ्ज्ञ आणि त्याच्याकडून काम करून घ्या. नाहीतर पडू दे ते संगणक तसेच बिनकामाचे." माझी नुकतीच पुण्याला सेटलमेंट कमिशनर या पदावर नियुक्ती झाली होती. त्याचवेळी सातबाराचे सर्व कागदपत्र संगणकावर उपलब्ध करुन द्यावे या महत्वाकांक्षी उद्देशाने केंद्र सरकारने सेटलमेंट कमिशनरला नोडल अधिकारी ठरवून मोठ्या संख्येने संगणक विकत घेण्यासाठी भरघोस अनुदान देऊ केले होते.

तोपर्यंत एवढ्या मोठया कार्यालयात फक्त एक संगणक होता- तो बॉसच्या म्हणजे माझ्या खोलीत आणि त्याला कुणी हात लावायचा नाही हा पूर्वापार चालत आलेला दंडक. त्यामुळे  त्यांनीच संगणकाला अंधाऱ्या खोलीतलं मारकं भूत ही उपमा लावली होती असे मला सांगितली. संगणक सुरु करुन कसा वापरायचा हे त्यांच्यापैकी फक्त एका दोघांनाच येत होत.

संगणक विकत घ्यायचे तर आपल्याला लागणा-या संगणकांचे स्पेसिफिकेशन कांय असेल- कुठल्या बाबींची काळजी घ्यावी लागते, इत्यादी गोष्टी माझ्या वरिष्ठ स्टाफला कळणे आवश्यक होते- तरच विभिन्न विक्रेत्यांनी देऊ केलेल्या ऑफर्सची तुलना करणे शक्य होते. म्हणून मीच सर्वांचा वर्ग भरवून संगणकाबाबत सर्वांचे प्रबोधन केले. स्क्रीन, उंदीर (माऊस), की-बोर्ड, स्पीकर्स, मिनी कॅमेरे आणि मोडेम इथपर्यंत ठीक होते. हे सर्व भाग आपल्याला समोर दिसतात. पण खरे स्पेसीफिकेशन ठरवावे लागते ते कारभारी डब्याच्या आंतील भागांचे. त्या प्रत्येकाचे काम काय असते, प्रोसेसर चिपची स्पीड, हार्डडिस्क आणी रॅमची क्षमता कशी निवडायची, आपल्या कार्यालयाची गरज कशी ठरवायची, क्षमता व किंमत यांचा मेळ कसा घालायचा, विक्रेत्याबरोबर घासाघीस, प्राइस निगोसिएशन कशी करायची हे सर्व त्या प्रबोधनांत होते. पण सर्वांत महत्वाची गोष्ट होती की मायक्रोसॉफ्टने पूर्वीची डॉस ऑपरेटिंग सिस्टम बदलून जी विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आणली त्यामुळे नेमका कांय सोपेपणा आला आणी त्यामुळे आता ऑफिसातील सर्वांनी संगणक कां आणी कसा शिकून घ्यायचा.

त्या प्रशिक्षण वर्गातील विषयांबाबत थोडी माहिती इथे देत आहे कारण हा संगणक-इतिहासातील एक धडाच आहे असे म्हणता येईल.

कारभारी डब्यामध्ये एका मदर-बोर्डवर संगणकाचा मेंदू (प्रोसेसर चिप), रॅम आणि हार्ड-डिस्क बसवलेले असतात. रॅम आणि हार्ड-डिस्कची क्षमता मेगा किंवा गेगा बाईट मध्ये मोजतात. मेंदू किती स्पीडने गणितं व आपली कामे करणार आहे, ते देखील महत्वाचे म्हणून तपासून घ्यायचे असते. मदर बोर्ड वरच संगणकाचा पडदा, की-बोर्ड, माऊस जोडण्याच्या जागा असतात. त्या पुरेशा आहेत ना ते पहावे लागते. संगणकाला फ्लॉपी (त्या काळी --आता वापरांत नाही) किंवा सीडी मार्फत माहिती द्यायची असेल तर ती सीडी चालवता येणारी यंत्रणा म्हणजे सीडी ड्राइव्ह पण असावी लागते. तसेच नवीन सीडी तयार करता येण्यासाठी सीडी राइट करू शकणारा ड्राइव्ह पण लागतो, मग त्यांची क्षमता  व वेग कांय असेल हे प्रश्नही आलेच.

मदर बोर्डावर मेंदू किंवा प्रोसेसर चिप असते  त्याचप्रमाणे संगणक सुरु होण्यासाठी लागणाऱ्या प्रारंभिक सूचना देणारी आणखीन एक चिप असते - हिला बायोस म्हणतात.
BIOS = "Basic Input Output System"
Processor == "brain" (मेंदू )

संगणक सुरू केल्यावर प्रोसेसर चिपला आरंभिक तपासणीच्या थोड्या सूचना बायोस कडून मिळतात. जसे की, वीजपुरवठा नीट आहे ना, की-बोर्ड जोडला आहे ना, पडदा काम करतोय ना वगैरे. मग पुढील काम करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टमकडून आदेश घे असा  प्रोसेसर चिपला अंदुलीनिर्देश करून बायोस बाजूला थांबतो. ही ऑपरेटिंग सिस्टम बहुधा हार्ड डिस्क मधेच असते पण कधी कधी सीडीवर, किवा सर्व्हरवर असू शकते.

संगणकाच्या प्रगतीचे रहस्य या प्रोसेसर चिप मध्ये आहे. प्रत्येक चिपला एक नंबर दिला जातो. संगणकासाठी १९८५ पासून पुढे पुढे वापरल्या जाणा-या चिप्सचे नंबर होते
८०८६,
८०१८६ (या नंबरची चिप काढली नाही)
८०२८६
८०३८६
८०४८६
८०५८६ पेंटियम (सध्या सर्वत्र वापरांत)

प्रोसेसर चिपची प्रत्येक नवी आवृत्ती म्हणजे जास्त स्पीड, जास्त मोठी माहिती हाताळण्याची व जास्त काम करण्याची क्षमता.

संगणकाच्या कामाचे दोन भाग पडतात- यंत्र - म्हणजे हार्डवेअर. उदा. की-बोर्ड. हा नसेल तर संगणकाला देण्याच्या सूचना आपण टाईप कशा करणार? दुसरा भाग असतो तंत्र - म्हणजे संगणकावर एखादे काम नेमके कसे करावे याबाबतचे क्रमवार टप्पे. हे समजून आत्मसात करावा लागतात.

पूर्वी जेंव्हा प्रोसेसर चिपची क्षमता खूप कमी होती, तेव्हां त्यावर कराव्या लागणाऱ्या प्रत्येक कामाचे हजारो छोटे छोटे भाग पाडून ते ते करण्यासाठी एक एक खास तंत्र ठरवून द्यावे लागत असे. याला प्रोग्रामिंग म्हणत व हे अति किचकट काम असायचे. प्रोग्रामिंग केल्याशिवाय संगणकाला नीटपणे सूचना देता येत नसत. प्रोग्राम लिहीणारे प्रोग्रामर उच्चशिक्षित असावे लागत. प्रत्येक वेगळ्या कामासाठी वेगळा प्रोग्राम लिहावा लागत असे. उदा. एकदा मला वाटले की, संगणकाने मी सांगेन तेव्हा मला गुणाकाराची दहा गणितं कागदावर छापून द्यावीत. मी कांही प्रोग्रामिंग तज्ज्ञ नाही त्यामुळे यासाठी एक प्रोग्राम तयार करायला मला पांच दिवस लागले. हे प्रोग्रमिंग संगणकाला त्याच्या वेगळ्या भाषेत सांगावे लागत. बेसिक कोबोल, सी, अशा कांही भाषा त्याकाळी शिकून घ्याव्या लागत. तरच प्रोग्रामिंग करता येत असे - तरच संगणकाला काम सांगता येऊ शकत असे.

चिपची पेंटियम-आवृत्ती निघाल्याबरोबर तिच्या अधिक क्षमतेचा फायदा घेत ऑपरेटिंग सिस्टम बनवणाऱ्यांनी कांय केले ? तर या प्रोग्रामिंग मधील कित्येक बाबींना प्रमाणभूत अशी एकच पद्धत ठरवून टाकली व त्या बाबींचा समावेश ऑपरेटिंग सिस्टम मध्येच करुन टाकला. चिपच्या वाढीव क्षमतेमुळे त्या प्रमाणांत रॅम आणि हार्ड डिस्कची क्षमता पण वाढवता आली होती. त्यांचा उपयोग करून मोठी ऑपरेटिंग सिस्टम आणता आली. ती गरजेची होतीच, स्वस्त पण होती आणि सामान्य माणसाला वापरायला सोपी पण होती.

याबाबत एक उदाहरण मी नेहमी देते. फार पूर्वी कपडे शिवायचे म्हणजे एक कार्यक्रमच असायचा. कापड आणा, मग शिंपी येऊन मापं घेणार, फॅशन व स्टाइल कोणती ते ठरणार, मग तो कच्ची शिवण करून ट्रायलला आणणार, आपण ओके केल्यावर पक्की शिलाई करणार. आमच्या लहानपणी एका महिन्याची निश्चिंती असे. पण मग बॅगीचा जमाना आला, सगळ्यांनी एकाच मापाचे ढगळ कपडे घालण्याची फॅशन आली आणि काम सोप्पे होऊन गेले. धडाधड रेडीमेड कपड्याचा धंदा वाढला.
संगणकाच्या हार्डवेअर व सॉफ्टवेअर दोन्हीं बाबतीत तेच झाले.

पण यांतील कळीचा मुद्दा असा की, सॉफ्टवेअरच्या विकासामुळे प्रोग्रामिंग तंत्राचा बराच भाग आता यंत्राचा भाग (ऑपरेटिंग सिस्टम) बनून गेला. उरलेले तंत्र सोपे सोपे होत गेले. हळू हळू सामान्य व्यवहारांच्या कार्यालयांना तसेच घरगुती  वापरासाठी वेगळे प्रोग्रामिंग करण्याची गरज पूर्णपणे संपली. सामान्य माणसाने तसेच सामान्य शासकीय कर्मचाऱ्याने कोणतेही प्रोग्रामिंग न शिकता संगणक वापरणे सुकर झाले.

म्हणजे सर्वच संगणकांना प्रोग्रामिंगची गरज संपली असे नाही. अजूनही वैज्ञानिक कामांसाठी, मोठ्या सिस्टिम्स साभाळण्यासाठी, संगणकाला जास्त चांगल्या प्रकारे काम करायला शिकवण्यासाठी प्रोग्रामिंगची गरज लागते आणि ते करायला तज्ञ मंडळीच लागतात.

सेटलमेंट कमिशनर कार्यालयांत मोठ्या संख्येने संगणक घेतल्यानंतर जास्तीत जास्त लोकांनी पटपट संगणक शिकणे गरजेचे आहे व शक्यही आहे असे मला वाटले. त्यासाठी वरीलप्रमाणे तंत्राकडून यंत्राकडे वाटचाल कशी झाली होती आणि संगणकाच्या प्रगत प्रोसेसर चिपमधून ते कसे घडले होते हा इतिहास मी सांगितला. इतर यंत्रांमधे अशी यंत्र व तंत्राची सरमिसळ सहजपणे होऊ शकत नाही. संगणकांत ती झाल्यामुळे आता जुन्या काळाप्रमाणे प्रोग्रामिंग कोण करणार असा प्रश्न उरला नव्हता, असे सर्व सांगून मी सर्वांनी रोज एक ते दोन तास संगणकावर काम शिकून घेण्याचे आदेश काढले.

हे सर्व करतांना ऑफिसची कार्यक्षमता वाढावी एवढाच हेतू मनांत होता. पण एक दिवस अशी घटना झाली ज्यामुळे एका वेगळ्याच मानवी पैलूचं दर्शन घडलं. त्या कार्यालयांत वयाची ५५ वर्षे ओलांडून आता लौकरच ५८ वर्ष संपतील आणि आपण रिटायर होऊ असे विचार करणारी मंडळी होती -- विशेषतः महिला. त्या सर्वांनी विरोध केला- आम्ही आता या वयांत ही नवीन ब्याद का म्हणून शिकायची?

यावर मी उत्तर दिले की, तुमच्या शाळेत जाणा-या नातवंडांना "बघा, तुमच्या आधी मी संगणक शिकलेली आहे" अस तुम्ही ठणकावून सांगू शकता. ही कल्पना बहुतेक सर्वांना आवडली. थोड्या दिवसानंतर कांही आजी-आजोबा मला आपणहून सांगू लागले की, रात्री त्यांचा आणि नातवंडांचा संगणकाबाबत कसा छान संवाद झाला.

त्याच सुमारास एका बाईंचा मुलगा अचानकपणे प्रमोशन मिळून अमेरिकेत रवाना झाला. सुमारे आठवडाभराने त्याने तिकडे व यांनी इकडे संगणक विकत घेतले. त्याला मिनी कॅमेरे जोडण्याची व्यवस्था असते तिचा वापर केला आणि एकमेकांना पाहात संगणकावरुन त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. शिवाय ईमेलही ओघाने आलीच.

त्यांनी येऊन मला आवर्जून सांगितले- मॅडम, कुणीही संगणक शिकायला नाखूष असेल तर मला सांगा - संगणक का शिकावा याबाबत आता मी सर्वांची समजूत काढू शकेन. आपल्या लांब जाऊन राहिलेल्या मुलाबाळांना रोज डोळा भरुन पहाता येणं, त्यांना मायेचा ओलावा देणं आणि जेवणाच्या टेबलावर असू इतक्या सहजतेने गप्पा मारता येणं हे केवढे सुख आहे हे त्यांना मी सांगू शकेन.
======================================================

No comments: