Sunday, June 14, 2009

पुणे रेल्वे स्थानकावर संगणक -- हृषीकेश मेहेंदळे

पुणे  रेल्वे  स्थानकावर  संगणक
  --हृषीकेश मेहेंदळे.
1 जुलै 1997 च्या आधी कधीतरी

खूप लोकांची खूपं काम जलद गतीने करायची असतात, तेंव्हा संगणक खूप उपयोगी पडतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे रेल्वेच्या सीट किंवा बर्थ रिझर्वेशनच्या कामात.

रेल्वेने दिवसभरात लाखो लोक ये जा करत असतात. ज्या लोकांना लांबचा प्रवास करायचा असतो त्यांना रिझर्वेशन करावे लागते. कधी कधी जवळचा प्रवास असेल तरी सुध्दा सोईसाठी रिझर्वेशन करतात. इतक्या सगळ्या लोकांचे वेगवेगळ्या गाड्यांमध्ये व कधी कधी लांबच्या एखाद्या स्टेशन पासून कुठल्यातरी आणखी तिसऱ्याच स्टेशन पर्यन्त सुध्दा रिझर्वेशन करावे लागते. ज्या काळात संगणक नव्हते त्या काळी लोकांना साधे पुणे मुंबई रिझर्वेशन करायला किती त्रास व्हायचा! मग पुढे गाड्या बदलाव्या लागणारे रिझर्वेशन करायला किती त्रास होत असणार.
   
आता संगणकर आल्यामुळे हे सर्व फारच सोपे झाले आहे. हे सगळे काम  संगणकावर  कसे करत असतील? असा माझ्या मनात विचार आला. म्हणून मी पुणे स्टेशनवर हे सर्व बघायला गेलो.

आता संगणक म्हटले की दोन प्रकार असतात -- एक म्हणजे dumb व दुसरे Intelligent तर आता तुम्ही म्हणाल की ह्या dumb व Intelligent ह्या काय भानगडी आहेत बरे?

या दोघांमध्ये एक मोठ्ठा फरक आहे. Intelligent म्हणजे एक संपूर्ण संगणक असतो. म्हणजेच त्यात संगणकाचे सर्व भाग आले. म्हणजेच CPU जो संगणकाचा खरा मेंदू असतो, मॉनिटर जो संगणकावर काय चालले आहे हे दाखवतो, (साधारण T.V प्रमाणेच) की- बोर्ड, ज्याने आपण संगणकाला विविध गोष्टी करायला सांगू शकतो, आणि एक माऊस ज्याचे कामही संगणकाला आदेश सांगण्याचे असते.
     मग Dumb Computer म्हणजे काय?
     साधारण भाषेत Dumb Computer म्हणजे की- बोर्ड व मॉनिटरची एक जोडी, याला स्वतःला मेंदू नसतो, म्हणून याला आपण ठोंब्या म्हणू.

     तुम्ही Computer मध्ये Net working हा शब्द ऐकला असेल. दोन किंवा जास्ती Computers ना एकत्र जोडून वापरण्याची क्रिया म्हणजेच Networking! तर Dumb computer मध्ये त्याच्या पेक्षाही भन्नाट आयडिया वापरतात. त्यात एकाच CPU ला एकाच वेळी खूप लोकं वापरू शकतात. एका इथरनेट (Ethernet) नामक उपकरणाद्वारे एका CPU ला ठोंबे जोडलेले असतात. आणि प्रत्येक ठोंब्याला एक ऑपरेटर वापरू शकतो.
     आता तुम्हाला हे सर्व कशाला सांगितले? तर मी जर नुसतेच म्हटले असते की रेल्वे स्टेशनवर Dumb Computer वापरतात तर याचा अर्थ काय लावायचा हे बऱ्याच लोकांना कळले नसते. बरे ते जाऊद्या.
     तर आता तुम्ही विचाराल की रेल्वे स्टेशनवर जर फक्त ठोंबेच वापरतात, तर ते संगणक म्हणून बुध्दिचे किंवा युक्तीचे काम कसे काय करतात? बघूया....
   
पुणे स्टेशनवरून असे ४३ ठोंबे मुंबई मार्गे उपग्रहाद्वारे दिल्लीतल्या मुख्य CPU ला जोडलेले आहेत. पण त्यामध्ये टप्पे आहेत. पुणे स्टेशनचा ईथरनेट मुंबईच्या विभागीय Workstation ला उपग्रहाद्वारे जोडलेला आहे. तसेच नाशिक, भुसावळ, नागपूर इत्यादि स्टेशनवरचे इथरनेट सुद्धा मुंबईच्या विभागीय वर्क स्टेशनला जोडलेले आहेत. असेच कलकत्ता, हैद्राबाद इ. विभागीय रेल्वे केंद्रांचे वर्कस्टेशन सुद्धा दिल्लीच्या CPU ला जोडलेले आहेत. अशा प्रत्येक रिजनल वर्क स्टेशनवर एक Trans- receiver, एक इथरनेट, एक Multiplexer इत्यादि बरीच उपकरणे असतात. शिवाय त्या विभागातील मुख्य स्टेशनवरचे ठोंबे पण वर्क स्टेशनला जोडलेले असतात. या उपग्रहाच्या Network द्वारे दुसऱ्या कुठल्याही स्टेशनवरची स्थिती कळू शकते.
     या सगळ्या गुंतागुंतीचा फायदा असा की समजा मला मुंबई - कलकत्ता- दिल्ली असे तिकीट हवे आहे, तर मी पुण्यातल्या पुण्यातच हे कनेक्टिंग तिकीट काढू शकतो, व मला ते कन्फरमेशनसकट मिळू शकते. दुसरा फायदा हा की, समजा माझे हे कलकत्ता-दिल्ली तिकीट १०-३० वाजता कन्फर्म झाले व मला त्या ट्रेनवरची शेवटची जागा मिळाली, समजा कलकत्त्याला कुणी १०-३५ ला रिझर्वेशन करायला आला व त्याला सुद्धा हीच ट्रेन पकडायची असेल तर माझे रिझर्वेशन कायम राहील व त्याला वेटिंग लिस्ट मिळेल. याचे कारण हे की एका स्टेशनवरून दुसऱ्या कुठल्याही स्टेशनची परिस्थिती बघता येते. त्यामुळे मी आधी केलेल्या रिझर्वेशनची नोंद कलकत्त्याला दिसते. व तिथल्या माणसाला थांबवले जाते.

     हे सर्व होण्याकरितां सर्व स्टेशनवरची माहिती एकाच ठिकाणी एकाच वेळी लागते. म्हणजे पुण्यात बुध्दिमान संगणक व कलकत्त्यात बुध्दिमान संगणक असले व ते एकमेकापासून सुटे-सुटे असले तर त्यांचा उपयोग नाही. ते जोडलेले असले तरी त्याचा उपयोग नाही कारण असे किती CPU तुम्ही एकमेकांना जोडणार हो! त्याऐवजी ठोंबे असतांना Communication खूपच सोईचे, सोपे व तुलनेने अतिशय कमी खर्चाचे असते. मग या सर्व ठोंब्यांना चालवायला जो मेंदू CPU लागतो तो कुठे आहे बरे? तर हा CPU दिल्ली मध्ये आहे. उपग्रहाव्दारे हा मुंबई-कलकत्ता इ. रिजनल HQ ना जोडलेला आहे. व HQ चे ईथरनेट त्या त्या विभागातील महत्वाच्या स्टेशनवरच्या ईथरनेटला जोडलेला आहे.

मी पुणे स्टेशनवर हे सर्व जेव्हा बघत होतो तेंव्हा त्यांना मी नमुना म्हणून विचारले की उद्याच्या दिल्ली- मुंबई राजधानीची किती रिझर्वेशन शिल्लक आहेत? तेंव्हा ती माहिती त्यांनी तात्काळ काढून दाखवली व तुला रिझर्वेशन हवे का? अस विचारले. अशी पस्तीस हजार रोजची रिझर्वेशन फक्त पुणे स्टेशनवरुन होत असतात, असे ही मला सांगितले. यातली ५-६ हजार तर फक्त पुणे- मुंबई साठीच असतात.
कुठलाही संगणक चालवायला एक आदेश प्रणाली किंवा ऑपरेटिंग सिस्टम (OS) लागते जशी Dos, Unix, Win95 (इतर OS सुद्धा बनवता येतात) पण रेल्वे स्टेशनच्या कामा मध्ये फक्त गणिताची गरज असते, जसे पुणे- दिल्ली- झेलमचे सेकंड क्लासचे भाडे किती? समजा मला २ फुल,  एक हाफ रिझर्वेशन हवी असतील तर त्यांचे भाडे किती? इत्यादि! म्हणून फोर्ट्रान नावाच्या संगणक भाषेत एक आदेश प्रणाली बनवली व त्यात चालणारे प्रोग्राम बनवले.
त्यामुळे रेल्वेच्या संगणकावर तेवढी ठराविकच म्हणजे गणिताची कामे करता येतात. पण रेल्वेच्या कामाला तेवढ्याचीच गरज असते.

आज पुणे रेल्वे स्टेशनच्या विविध खिडक्यांवर एक एक ठोंबा आहे! शिवाय गांवात जी  रेल्वे रिझर्वेशन केंद्र आहेत त्यात सुद्धा पुणे स्टेशनला जोडलेले ठोंबे आहेत. शिवाय लोणावळा, सोलापूर इ. सारख्या लांबच्या स्टेशनावरचे ठोंबे सुद्धा पुण्यालाच जोडलेले आहेत! पुणे स्टेशनवर असे एकूण ४३ ठोंबे जोडलेले आहेत.
     आपण फोनने जी रेल्वे इंन्कवायरी करतो ते म्हणजे काय? तर एवढेच की रेल्वे स्टेशनवर बसलेला माणूस ही माहिती वाचून दाखवतो. संगणकामुळे त्याला कुठलीही माहिती मिळू शकते.
     पण मग एवढी सगळी माहिती साठवतात कुठे? कशावर? तर ज्या स्टेशनवर गाडी सुटणार आहे त्याच स्टेशनवर रिझर्वेशन चार्टवर ही माहिती साठवलेली असते. संगणकावर सुध्दा असते. म्हणजे रिझर्वेशन लिस्ट हरवली तर Backup म्हणून! पण ही माहिती गरज संपल्यावर पुसून टाकायला लागते, म्हणून लहान अंतरावरच्या गाड्यांची माहिती गाडी सुटल्यावर ३ तासाने व लांबच्या गाड्यांकरिता गाडी सुटल्यावर ४ तासांनी आपोआप ही माहिती पुसली जाते त्यामुळे नवीन माहिती करता जागा तयार होते.
     अशा प्रकारे संगणकामुळे रेल्वेचे काम खूपच सोपे होऊन रिझर्वेशन तिकीटासाठी लागणाऱ्या लांबलचक रांगा कमी झाल्या. आता आयत्या वेळच्या तिकीटाच्या रांगा थांबविण्यासाठी इतर उपाय पण रेल्वे करीत आहे.

हृषिकेश मेहेंदळे

पत्ता-
भाई बंगला,
५०, लोकमान्य कॉलनी,
पौड रोड, कोथरुड,
पुणे- ४११०३८
   

No comments: