Friday, June 26, 2009

भाग -- 25 -- चित्रकार

भाग -- 25 -- चित्रकार
संगणक म्हणजे चित्रकार
(पुस्तकाप्रमाणे तपासले -done)
हे वर्णन अगदी चूक आहे. चित्रकाराची कल्पनाशक्ति, त्याच्या कुंचल्याचे सामर्थ्य आणि निरनिराळया प्रतीकं व बिंबांच्या सहाय्याने विषय वस्तूची किंवा चित्राची मांडणी करण्याची चित्रकारांची प्रतिभा हे संगणकाला कधीच येणार नाही.
पण चित्र या विषयी संगणकावर बरेच कांही करता येते. तसेच ते फोटो, गाणी आणि व्हिडियोंच्या बाबतीतही करता येते. विशेषत: आपल्याकडे उपलब्ध असलेल्या गोष्टींमध्ये थोडेसे बदल किंवा दुरु‎स्त्या करता येतात. आपण चित्रापासून सुरुवात करु या.
आपल्याकडील एखादे छानसे चित्र स्कॅन करुन संगणकावर फाईलच्या स्वरुपात ठेवता येते. आता मायक्रोसॉफ्ट पेंट किंवा फोटोशापसारख्या प्रोग्रामच्या सहाय्याने ती फाईल उघडून दुरुस्त करायला घेतली की पहिल्यांदा संगणकाच्या पाटीवर ते चित्र दिसतं.
* आपल्याला या चित्राच्या अनेक हुबेहुब प्रतिकृती करुन हव्या तशा मांडून घेता येतात,
* हवे त्या प्रतिकृतिंचे आकार लहान मोठे करता येतात.
* चित्राचे आरसा-प्रतिबिंब तयार करता येते.
* शिवाय चित्रातला एखादा भाग पुसून त्यावर दुसरे काही तरी रंग देता येतात.
* आपण‌ पेंट हा प्रोग्राम सुरु‎ करतांना त्यावर एखादे चित्र उघडले नसेल तर कोरी पाटी उघडते. त्यावर आपण जरी चित्रकार नसलो तरी गोल, त्रिकोण, चौकोन, ढग, झाडांची आऊटलाईन, असे काहीतरी काढून त्यावर रंग भरु‎ शकतो.
* एका चित्रातील काही भाग उचलून (उदाहरणार्थ झाड, चिमण्या- काहीही) दुसर्‍या चित्रात समाविष्ट करता येतो.
* चित्रातील रेघा गडद किंवा फिक्या करता येतात.
* एखाद्या भागाची रंगसंगीत बदलता येते.
* त्यामध्ये छोटेसे वर्णन पण लिहू शकतो.
* ते मराठी भाषेतूनही असू शकते.
* असे काढलेले चित्र आपण चित्ररूप फाईलीमध्ये सेव्ह (जतन) करू शकतो. त्यातील सर्व रंगसंगती, ठिपके, सूक्ष्म रेषांसहित स्पष्ट उमटावे असे वाटत असेल (जसे चित्रकार, डिझाइनर यांना लागते) तर bitmap या स्वरूपात साठवता येते, पण त्या फाइलचा आकार खूप मोठा असतो - अगदी दहा-वीस MB पर्यन्त. त्यातील स्पष्टता थोडी कमी होऊन चालत असेल तर आपण jpeg या स्वरुपात साठवू शकतो. jpeg फाईल पुढच्या वेळी bitmap मध्ये साठवली तर ती फारच खराब दिसते. म्हणून पुढे मागे जास्त स्पष्ट फाईल लागणार नसेल तरच jpeg फाईल बनवतात. छपाई इत्यादीसाठी बिटमॅप फाईलच वापरतात.
हे झाले अगदी सामान्य माणसाने करायचे काम. पण वस्त्रोद्योगात खूप उपयोगी पडणारे काम संगणक करतो. यासाठी काही छान संगणक सॉफ्टवेअर केलेले आहेत. त्या योगे एकाच डिझाइनला निरनिराळी रंगसंगति दिल्यास ते कसे दिसेल हे आपण संगणकावर पाहू शकतो. फुलं, पानं, कुयर्‍या ठिपके इत्यादी वापरुन साडीचे डिझाइन तयार केल्यावर त्यातील फुलांचे रंग बदलून, बॅकग्राऊंडचा रंग बदलून, विविध रंगसंगती तपासून त्यातून निवड करता येते. आपण दुकानात गेल्यावर विचारतो याच प्रिंटमध्ये वेगळे रंग आहेत का, तो म्हणतो - हो, हे पाच रंग तुमच्यासमोर ठेवले बघा. हा प्रकार संगणकाच्या प्रोग्राममुळे खूप सोपा झाला आहे. अगदी 1986 मध्ये जेव्हा आपल्या देशात फक्त मोठाल्या वैज्ञानिक संस्थाच संगणक वापरत असत त्या काळात मुंबईच्या सास्मिरा या वस्त्रोद्योगांत रिसर्च करणार्‍या संस्थेमध्ये मी हे सॉफ्टवेअर पाहून प्रभावित झाले होते व मनोमन त्या संस्थेला शंभर टक्के मार्क देऊन टाकले होते.

हल्ली फॅशन डिझाइनर हे चांगले करियर झाले आहे. त्याच्या विद्यार्थ्यांनी संगणकावर डिझाइन करायला शिकलेच पाहिजे. तीच बाब ऍनिमेशन डिझाइनरची.

आपल्याकडील चित्रांची दुरुस्ती किंवा बदल (editing) साठी आपण पेंट (व तत्सम) प्रोग्राम वापरतो. तसेच आपल्याकडील ध्वनिफीत किंवा चित्रफीतीमध्ये बदल, दुरुस्त्या इत्यादी करण्यासाठी आपल्याला AVI editor व तत्सम प्रोग्राम वापरता येतात. त्यामुळे जर संगणकाला चित्रकार हे वर्णन चालणार असेल तर कलाकार हे ही वर्णन चालू शकेल
------------------------------------------------------------------------------------

No comments: