भाग - 21
संगणक म्हणजे बुकिंग क्लार्क
(पुस्तकाप्रमाणे तपासले -done)
संगणकावर आपण स्वत: प्रोग्रॅमिंग करण्याची गरज जशीजशी कमी होत गेली तसा संगणकाचा वापर वैज्ञानिकांच्या, शास्त्रज्ञांच्या आणि तज्ञांच्या खोलीतून बाहेर पडून सामान्य माणसांच्या घरापर्यन्त, कार्यालयात, व्यापार उद्योगात मोठ्या प्रमाणांवर सुरू झाला. व्यापारी जगाने धडाक्याने याचा वापर बुकींग क्लार्क म्हणून करायला सुरूवात केली. अगदी रेल्वे तिकीट बुकींगचेच उदाहरण घेऊया.
फार पूर्वी आम्ही महाराष्ट्रातून बिहारमध्ये रेल्वेने जात असू तेव्हा वाटेत तीन गाड्या बदलाव्या लागत. धरणगावला तिकीट काढून आधी भुसावळ ते मोगलसराय कोलकाता मेलचे रिझर्व्हेशन हवे, पुढे मोगलसराय ते पटणा दुस-या गाडीचे, पुढे पटणा ते बरौनी तिस-या गाडीचे रिझर्व्हेशन लागत असे. मग धरणगावचे स्टेशन मास्तर तार पाठवून भुसावळ, मोगलसराय व पटणा येथे कळवत असत. तिथले स्टेशन मास्तर आमचे त्या त्या गाडीचे रिझर्व्हेशन करून तारेने उत्तर पाठवीत असत. रेल्वेसाठी खास टपाल-तार-यंत्रणा असल्याने आम्हांला रिझव्हर्वेशन झाल्याची माहिती खूप लवकर मिळत असे. आम्ही म्हणायचो, पाहा आपल्या रेल्वेचा कारभार किती कार्यक्षम आहे. आणि प्रवासाबद्दल आम्ही निश्चित राहत असू.
त्या त्या स्टेशन मास्तर कडे तार आवक-जावक रजिस्टर असायचे, त्यात कोणत्या तारा आल्या, पैकी कोणत्या तारांना उत्तर दिले, कुणाचे रिझर्वेशन केले इत्यादि माहिती असे. त्यावरून गाडीच्या वेळेवर रिझर्वेशनचा चार्ट तयार करून प्रवाश्यांच्या सोईसाठी फलाटावर तसेच गाडीच्या डब्यावर पण चिकटविला जात असे. इतकी सर्व काम त्या एक तार आवक-जावक रजिस्टार वरून होत असत. पण त्या पध्दतीत खूप लोकांना खूप वेळ काम करावं लागत असे. भुसावळ रेल्वेच्या स्टेशन मास्तरांनी भुसावळ ते मोगलसराय अस आमच रिझर्वेशन केल्याचं पुढल्या मोठ्या जंक्शनला म्हणजे इटारसीच्या व पुढच्या सर्व जंक्शन्सच्या स्टेशन मास्तरांना सुध्दा कळवावे लागे, जेणेकरून त्यांनी तिथून त्याच सिटांचे रिझर्व्हेशन देऊ नये.
आता रेल्वे प्रशासनाने आपली सर्व स्टेशन्स संगणकावर जोडली आहेत. त्यामुळे आपण आरक्षण करायचे ठरवल्याक्षणी तोपर्यंत झालेल्या बुकिंगची व रिकाम्या असलेल्या सिटांची माहिती मिळत राहते. शिवाय आता पुढचा टप्पा गाठून घरबसल्या आपण आपल्या घरांतील इंटरनेटची सुविधा वापरून रिझर्व्हेशन करूनही चालते आणि तिकीटही आपल्या संगणकावरच उपलब्ध होते, तेवढे आपण प्रिंट करून घ्यायचे. शिवाय एखादा कार्यक्षम स्टेशन मास्तर तासातासालादेखील ही माहिती मागवून योग्य ते नियोजन करू शकतो.
जगभरांतील सर्व विमान तिकिटांचे बुकिंग, मोठमोठ्या हॉटेल्समधील खोल्यांचे बुकिंग हे संगणकावर होऊ लागलेले आहे. ज्या प्रेक्षणीय स्थळांवर आत जायला तिकिट काढावे लागते तेथील व्यवस्थापकांनी आपली वेबसाईट तयार करून तिथेच तिकिट बुकिंगची सोय करायची आणि तुम्ही घरून तिकिट घेऊन तिथल्या रांगेत उभे न रहावे लागता आत जाऊ शकता, अशी सोय पण जगभरात दिली जाते.
महाराष्ट्रात एस.टी.महामंडळाला देखील ही सुविधा देणे शक्य आहे व लौकरच देण्याची योजना आहे.
काही मोठ्या मंदिरांनी ही बुकिंगची पध्दत वापरायला सुरूवात केली आहे. आता समजा तुम्हांला चतुर्थीचा अभिषेक एका ठरावीक गणेश मंदिरात करायचा आहे, पण प्रत्यक्ष जाणे शक्य नाही, तर तिथले पुजारी तुमच्या विनंतीनुसार संगणकावर बुकिंग करून घेतात व त्या तिथीला तुमच्या नांवे अभिषेक घालतात. पुढच्या टप्प्यात काही मंदिराची अशी पण योजना आहे की तुमच्या नांवांने केलेल्या एक्सक्ल्यूसिव्ह अभिषेकाची व्हिडिओफीत तुम्हांला नंतर पाहता येईल किंवा त्याचवेळी व्हिडिओ कॉन्फरसिंग पद्धतीने तुम्ही स्वतःच्या खोलीत बसून अभिषेकाच्या पाठांत सहभागी होऊ शकाल.
------------------------------------------------------------------------------
Wednesday, June 10, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment