|| श्री ||
एक अभिनंदनीय उपक्रम
महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनातील ज्येष्ठ सनदी अधिकारी, अपर मुख्य सचिव, श्रीमती लीना मेहेंदळे यांनी राज्याच्या प्रशासनात संगणकाचा अधिकाधिक वापर व्हावा या उद्देशाने “संगणकाची जादुई दुनिया” या नावाने लिहिलेले हे पुस्तक अत्यंत सोप्या, सुलभ व ओघवत्या शैलीत असून प्रथम मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो.
दिनांक 1 मे, 1960 रोजी स्थापन झालेले महाराष्ट्र राज्य आज देशातील एक अग्रगण्य ठरलेले राज्य आहे. महाराष्ट्रातील जवळ-जवळ पन्नास टक्के जनता ही ग्रामीण भागातील आहे. महाराष्ट्र कृषी प्रधान राज्य असून देखील औद्योगिक विकासाच्या निरनिराळया आघाडयांवर अग्रेसर आहे.
राज्याच्या या प्रगतीसाठी महत्वपूर्ण ठरणा-या विविध घटकांपैकी, राज्यात स्थापित असणारे लोकाभिमुख व पारदर्शक प्रशासन आणि राज्यातील सुव्यवस्था यांचा वाटा फार मोलाचा आहे. राज्यात विविध प्रकारचे प्रगतिशील कायदे आणि उपक्रम वेळोवेळी राबविण्यात येतात. “नागरिकांची सनद” आणि “माहितीचा अधिकार 2005” या कायद्यान्वये माहितीचे सुयोग्य संकलन आणि विकेंद्रीकरण यांची उत्तम सांगड घातलेले हे प्रगत राज्य आहे.
महाराष्ट्र राज्याची भौगोलिक, व्याप्ती लक्षात घेता शासनाच्या विविध स्तरावर सदरहू माहितीचे संकलन वेळचेवेळी जलद गतीने होणे आवश्यक आहे. त्याकरिता संगणक तंत्रज्ञानाचा विशेषात्वाने वापर करणे गरजेचे आहे.
त्यादृष्टीने संगणकाची सुलभ हाताळणी आणि वापराचे तंत्र अवगत असणे महत्वाचे ठरतात. यासाठीच मी “संगणकाची जादुई दुनिया” या पुस्तकाचे स्वागत करतो. या आधीही मेहेंदळे यांनी विविध विषयांवर मराठीत सात व हिन्दीत तेरा पुस्तके लिहिली आहेत पण शासकीय कारभारासाठी उपयुक्त या पुस्तकाचे मला विशेष महत्व वाटते.
सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात नवनव्या तंत्रज्ञानाचा दैनंदिन आयुष्यातील वापर नक्कीच वाढता राहणार आहे. समाजातील सर्व स्तरातील सर्व वयोगटात संगणक साक्षरता वाढून त्यांच्या मनात असलेली संगणकाविषयीची अनाठायी भीती कमी होण्यास या पुस्तकाची नक्की मदत होईल याबाबत मला पूर्ण विश्वास आहे. संगणकावरील ईमेल व्यवहार, फाईलचे व्यवस्थापन, एक्सेलचा वापर यासारखी प्रकरणे शासकीय कामांची गती वाढवण्याकामी अतिशय उपयुक्त आहेत.
संगणकावर मराठीचा वापर वाढण्याकामी सी-डॅक या शासकीय संस्थेने तयार केलेल्या युनिकोड-मान्य इनस्क्रिप्ट या सोप्या की-बोर्डचा वापर, आणि युनिकोड प्रमाणकीकरणामधील प्रश्नांचा उहापोह समजून घेतल्याने भाषेची अस्मिता टिकवण्याला बळ मिळेल. दूरदेशी गेलेल्या सुहृद नातेवाइकांशी सुसंवाद राखण्यासाठी वापर करण्याचे प्रकरण देखील वाचकांस अत्यंत उपयुक्त ठरेल व शासनात संगणकावर मराठीचा वापर वाढविण्याचे साधन ठरेल यात शंका नाही.
श्रीमती मेहेंदळे यांच्या या स्तुत्य उपक्रमांस माझ्या हार्दिक शुभेच्छा.
( अशोक चव्हाण )
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
Saturday, December 12, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment